चिंता वाढविणारा अहवाल प्रसिद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगात टाइप 1 मधूमेहाने ग्रस्त सर्वाधिक मुले आणि किशोरवयीन भारतात राहत आहेत. टाइप 1 मधमुहाने पीडित जगातील प्रत्येक पाचवे मूल किंवा किशोरवयीन भारतीय आहे. भारतात दर दिनी 65 मुले किंवा किशोरवयीन टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त होत असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी पाहिल्यास भारतात टाइप 1 मधुमेह मोठी समस्या ठरत चालल्याचे स्पष्ट होते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशननुसार (आयडीएफ) मधुमेहामुळे मागील वर्षी जगभरात 67 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू 20-79 वयोगटातील लोकांचे होते.
जगभरात टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त मुलांची आणि किशोरवयीनांची संख्या वेगाने वाढत आहे. 2021 पर्यंत जगभरात 12.11 लाखांहून अधिक मुले आणि किशोरवयीन टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त होते. यातील निम्म्याहून अधिक मुलांच sवय 15 वर्षांपेक्षा कमी आहे. यातही सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. भारतात 2.29 लाखांहून अधिक मुले आणि किशोरवयीन टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त आहेत.
मधुमेह दोन प्रकारचे असतात, टाइप 1 मधुमेह कमी वयातच होतो. यामुळे पीडित व्यक्तीला जगण्यासाठी इन्सुलिनच्या इंजेक्शनच गरज भासते. यावर कुठलाच ठोस उपचार नाही. तर टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त लोकांना औषधे आणि थेरपीद्वारे उपचार मिळू शकतो, परंतु त्यांनाही काही वेळा इन्सुलिनच्या इंजेक्शनची गरज भासते.
मागील वर्षी भारतात टाइप 1 मधुमेहाचे 24 हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच दरदिनी 65 हून अधिक मुले आणि किशोरवयीन टाइप 1 मधुमेहाचे शिकार ठरले आहेत. याचुमळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
भारतातील स्थिती
आयडीएफच्या नव्या अहवालानुसार भारतात 7.4 कोटी लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. याप्रकरणी भारत जगात दुसऱया क्रमांकावर आहे. 2045 पर्यंत मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या 12 कोटीवर पोहोचण्याचा अनुमान आहे. भारतात निम्म्याहून अधिक मधुमेहग्रस्तांना उपचार मिळत नसल्याची स्थिती आहे. मधुमेहाने ग्रस्त 7.5 कोटी लोकांपैकी 3.94 कोटी म्हणजहेच 53 टक्क्यांहून अधिक रुग्णांवर उपचार होत नाहीत. भारतात 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2.29 लाखांहून अधिक लोक टाइप 1 मधुमेहाला तोंड देत आहेत. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. अमेरिकेत 1.57 लाख आणि ब्राझीलमध्ये 92,300 जणांना टाइप 1 मधुमेह आहे.
टाइप 1 मधुमेह अन् त्याची लक्षणे
टाइप 1 मधुमेह झाल्यावर शरीरात इन्सुलिनची निर्मिती थांबते. हा आजार सर्वसाधारपणे कमी वयात किंवा छोटय़ा मुलांमध्ये होतो. परंतु अनेकदा प्रौढ आणि अधिक वयाच्या लोकांनाही होऊ शकतो. आता जगातील अनेक मुलांमध्ये टाइप 2 मधुमेहाची प्रकरणेही दिसून आली आहेत. विशेषकरून स्थुलत्वाला तोंड देत असलेल्या मुलांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त लोकांना स्वतःच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दरदिनी इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वेगाने वजन कमी होणे ही सर्व टाइप 1 मधुमेहाची लक्षणे आहेत. याचबरोबर थकवा, अधिक भूक लागणे, धुसर दिसू लागणे देखील याची लक्षणे आहेत.