ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणजेच मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 यंदा पुण्यात होणार आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनशच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे ही स्पर्धा पाडणार आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएन (MOA) आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी MOA ची कार्यकारिणी बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री व संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत स्पर्धेला मान्यता देण्यात आली. या स्पर्धेत 32 विविध क्रीडा प्रकार असून, नऊ हजारांहून अधिक खेळाडू, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा यात सहभाग असणार आहे. या स्पर्धेसाठी राज्य सरकारने 19 कोटी 7 लाख 94 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, या स्पर्धेचा कालावधी अद्याप जाहीर झालेला नसून, सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या बैठकीला संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, खजिनदार धनंजय भोसले यांच्यासह राज्याच्या शालेय व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल व क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.