मूळ धनादेशाच्या रकमेच्या आकडय़ात स्वहस्ताक्षरात वाढ
लातूर / प्रतिनिधी
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात महसूल सहाय्यक (अव्वल कारकून) मनोज नागनाथ फुलबोयणे (रा. बोरी, ता. लातूर) याने बनावट आरटीजीएस व मूळ धनादेशाच्या रकमेच्या आकडय़ात स्वहस्ताक्षरात वाढ करून सात वर्षांच्या कालावधीत तब्बल 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत मनोज फुलबोयणेसह चौघांविरुद्ध शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज नागनाथ फुलबोयणे (रा. बोरी, ता. लातूर) हे जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील लेखा शाखा विभागात लिपिक, महसूल, सहाय्यक/अव्वल कारकून या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारची खरेदीची विविध शाखा व पुरवठादार यांच्याकडून येणारी देयके तपासून सक्षम प्राधिकार यांचे मान्यतेने संबंधितांना देयकाचे धनादेश देणे/आरटीजीएस करण्यासाठी बँक व्यवस्थापकास निर्देशपत्र देणे, नोंदवहीत नोंदी घेणे, बँक व्यवहार हाताळणे ही जबाबदारी आहे. मात्र, मनोज नागनाथ फुलबोयणे याने 26 मे 2015 ते 8 जून 2022 या दरम्यानच्या सात वर्षांच्या कालावधीत बनावट आरटीजीएस तयार करून, तहसीलदार यांच्या सहीचे धनादेशातील मूळ रकमेच्या आकडय़ात स्वःहस्ताक्षरात वाढ करून, असे आरटीजीएस/धनादेश स्वतःच्या, मित्राच्या बँक खात्यात जमा करून तब्बल 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी स्वतः मनोज नागनाथ फुलबोयणे, अरुण नागनाथ फुलबोयणे (दोघे भाऊ), सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे या चौघांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार महेश मुकुंदराव परंडेकर यांच्या फिर्यादीवरून लातूरच्या एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधा एक कारकून आपला भाऊ व अन्य दोघा खासगी व्यक्तीच्या मदतीने 22 कोटी रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक करू शकतो ही बातमी वाचूनच लातूरकरांना जबर धक्का बसला आहे. कोटय़वधीचे व्यवहार होणाऱया लेखा शाखेत या सर्व व्यवहारावर देखरेख करण्यासाठी एक स्वतंत्र तहसीलदार असतो. मनोज फुलबोयणेच्या कार्यकाळात 10 तहसीलदारांनी पदे भूषविली आहेत. त्यांच्यावर देखरेखीची जबाबदारी आहे. असे असताना या विभागातील एकटा मनोज फुलबोयणे हाच कसा अपहार करू शकतो, अशी शंका लातूरकर व्यक्त करीत आहेत. एक आरटीजीएस, खाडाखोड केलेला एक धनादेश संपादला जाऊ शकतो. पण असे काही धनादेश खाडाखोड करून 22 कोटींचा अपहार करणे हे एकटय़ाचे काम नव्हे अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कॅशबुक तपासले नाही का?
मनोज फुलबोयणे हे सुमारे सात वर्षे एवढा प्रदीर्घ काळ एकाच पदावर राहिले कसे? कोटय़वधी रुपयांचे व्यवहार होत असताना कॅशबुक का लिहले नाही? ऑडिटरने पहिल्या वषी कॅशबुक दाखविले नाही, असा शेरा मारला असतानाही सात वर्षांपर्यंतचे ‘विना कॅशबुक नोंद’ कसे काय व्यवहार झाले. या विभागात तहसीलदार दर्जाचा एक अधिकारी डिडिओ म्हणून असतो. फुलबोयणे यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात सुमारे 10 डिडिओ होऊन गेले. फुलबोयणे यांनी अनेक धनादेशाच्या आकडय़ात केलेली वाढ, बनावट आरटीजीएस, एकाही डिडिओच्या निदर्शनास येऊ नये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तपास स्वतंत्र एजन्सीकडे देण्याची मागणी
22 कोटी 87 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील ज्या कर्मचाऱयांच्या विरोधात शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मुख्य आरोपी मनोज नागनाथ फुलबोयणे व या गुह्याचा तपास करणारे तपास अधिकारी संजीवन मिरकले हे बोरी (ता. लातूर) या एकाच गावचे रहिवासी असल्याने त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. अपहाराची रक्कम 22 कोटीवर असल्याने याचा तपास लाचलुचपत सारख्या स्वतंत्र एजन्सी मार्फत करावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.