पुतीनसोबत करणार नाही चर्चा : झेलेंस्की
वृत्तसंस्था /कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला आहे. रशियाचे सैन्य जोपर्यंत युक्रेनमधून माघार घेत नाही तोवर आम्ही पुतीन यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हसमवेत 7 शहरांवर सुमारे 15 क्षेपणास्त्रs डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे नागरी इमारती तसेच ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांमुळे जपोरिजिया आण्विक प्रकल्पातून वीजपुरवठा बंद झाला आहे. कीव्हमधील 15 टक्के भागात ब्लॅकआउट झाला असून अनेक अन्य शहरांमध्येही वीजपुरवठा ठप्प आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
ब्लादिमीर पुतीन हे स्वतःचा शब्दच पाळत नाही, याचमुळे कुठल्याही स्थितीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू इच्छित नाही. पुतीन यांच्यावर आम्ही भरवसा ठेवत नाही. रशियाने युक्रेनमधून माघार घेतल्यावरच आम्ही त्यांच्याशी कुठल्याहीप्रकारची राजनयिक चर्चा करू. आम्ही या युद्धात विजय इच्छितो. मागील एक वर्षात आम्हाला दररोज नव्या आव्हानांची सवय झाली असल्याचे झेलेंस्की यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. चर्चेद्वारे लवकरात लवकर युद्ध संपविण्याचे आवाहन अमेरिकेने अनेकवेळा केले आहे. पुतीन अजूनही हे युद्ध रोखू शकतात. युद्ध लवकरात लवकर संपू शकेल अशाप्रकारच्या कुठल्याही पुढाकाराचे आम्ही स्वागत करू असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले आहे.
चीनचा शांतता प्रस्ताव
युद्धाला एक वर्ष पूर्ण झाल्याने संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत युक्रेनमध्ये शांतता आणि रशियन सैन्याच्या माघारीसंबंधी प्रस्ताव संमत झाला होता. तर चीनने 12 सुत्री शांतता प्रस्ताव जारी केला होता. यात रशिया-युक्रेनदरम्यान शस्त्रसंधीचे आवाहन करण्यात आले होते. दोन्ही देशांदरम्यान शांतता चर्चेसह रशियावर लादण्यात आलेले निर्बंध संपुष्टात आणण्याची सूचना यात नमूद होती.