काही दिवसांपूर्वी राजस्थानाच्या पश्चिम भागात अचानक रात्री आकाशातून आगीचा वर्षाव होत असलेला दिसून आला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱया लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. हा उल्कापात आहे की पाकिस्तानने केलेला क्षेपणास्त्रांचा वर्षावर आहे. यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे.
हा आगीचा वर्षाव अतिशय प्रखर होता. तो भारतात राजस्थानपासून पंजाबपर्यंत आणि पाकिस्तानातही आतल्या भागातील प्रदेशांमध्ये दिसून आला. या अग्निवर्षावामुळे शास्त्रज्ञ आणि सेनेचे अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा उल्कापात नाही कारण उल्कापाताची लक्षणे आणि दर्शन यापेक्षा अलग असते. हा भारतीय भूसेनेच्या सरावामध्ये डागल्या जाणाऱया क्षेपणास्त्रांच्या आगीचा परिणाम असावा, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
तथापि भारतीय सेनेच्या अधिकाऱयांनी वैज्ञानिकांच्या या मताला विरोध केला आहे. त्यांच्या मते अशा प्रकारचा सराव कधीच केला जात नाही. हा उल्कापातच असावा, असे ठाम मत व्यक्त त्यांनी केले. पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्राचा असा वर्षाव करणे शक्य नाही. कारण भारताची रडार यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. ती क्षेपणास्त्रे असतील तर त्वरित आम्हाला सूचना मिळाली असती आणि आम्ही तसेच प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले असते. भारतीय सेनेच्या सरावातही अशा प्रकारे आणि इतक्या मोठय़ा प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा सराव केला जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा प्रसंग पाहणाऱयांच्या मनात यामुळे गेंधळ निर्माण झाला आहे.
यापूर्वीही राजस्थानातील नागोर अरोडाकलान, मेढता रोड, मेढता शहर, खेळुली, कलरू, इत्यादी ठिकाणी असा प्रकाश वर्षाव झालेला दिसून आलेला आहे. हा परग्रहावरील मानवाने केलेला हल्ला असावा, अशी समजूत त्यावेळेला झाली होती. आजही उल्कापाताच्या संदर्भात अशीच अनेकांची समजूत असते.