न्यूझीलंड पहिल्या दिवसअखेर 4 बाद 318, पाचव्या गडय़ासाठी 149 धावांची अभेद्य भागीदारी
वृत्तसंस्था/ नॉटिंगहम
डॅरेल मिशेल (147 चेंडूत नाबाद 81) व टॉम ब्लंडेल (136 चेंडूत नाबाद 67) यांनी पाचव्या गडय़ासाठी 149 धावांची अभेद्य भागीदारी साकारल्यानंतर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 87 षटकात 4 बाद 318 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. जेम्स अँडरसन व बेन स्टोक्स यांच्या भेदक गोलंदाजीमुळे किवीज संघ एकवेळ 4 बाद 169 अशा स्थितीत होता. याचवेळी मिशेल-ब्लंडेलने डाव सावरण्यात सिंहाचा वाटा उचलला.
दिवसाच्या प्रारंभी चेंडूला हवेत किंवा सीमवर कमी मूव्हमेंट मिळत असली तरी बाऊन्स उत्तम होता. त्याचा लाभ घेत उपाहारापूर्वी अँडरसन व स्टोक्स यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. विल यंग (47) व धोकादायक भासणारा डेव्हॉन कॉनव्हे 46 धावांवर बाद झाले तर हेन्री निकोल्सला 30 धावांवर तंबूत परतावे लागले. यामुळे, किवीज संघातील पहिल्या चारपैकी एकाही फलंदाजाला अर्धशतक साजरे करता आले नसल्याचे स्पष्ट झाले.
मिशेल व ब्लंडेल यांनी उपाहारापर्यंत 26 धावांची भागीदारी साकारली.
झॅक क्राऊलीने झेल घेतला असता तर निकोल्सला 17 धावांवर बाद होत तंबूत परतावे लागले असते आणि यामुळे न्यूझीलंडच्या अडचणीत आणखी भर पडली असती. मात्र, त्यावेळी तो झेल सोडला गेला आणि नंतर रुटने डॅरेल मिशेलचा आणखी एक सोपा झेल सोडत आश्चर्याचा धक्का दिला. मिशेल त्यावेळी एका धावेवर होता.
नंतर स्टोक्सने निकोल्सला बाद केले. निकोल्सने बाहेर जाणाऱया चेंडूवर यष्टीरक्षक बेन फोक्सकडे सोपा झेल दिला. यामुळे त्याची कॉनव्हेसमवेत 77 धावांची भागीदारी संपुष्टात आली.
7 चौकार फटकावणाऱया कॉनव्हेने ड्राईव्ह व पूलचे काही अप्रतिम फटके लगावले. नंतर तो 46 धावांवर बाद झाला.
विल यंगला स्टोक्सने क्राऊलीकरवी झेलबाद केले. यंगने 70 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार लगावले आणि लॅथमसमवेत 84 धावा जोडल्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः 87 षटकात 4 बाद 318 (विल यंग 70 चेंडूत 9 चौकारांसह 47, डेव्हॉन कॉनव्हे 46, हेन्री निकोल्स 30, डॅरेल मिशेल नाबाद 81, टॉम ब्लंडेल नाबाद 67)
कोरोनाची बाधा झाल्याने केन विल्यम्सन सामन्यातून बाहेर
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे तो इंग्लंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. विल्यम्सन पाच दिवस आयसोलेट झाला असून हमिश रुदरफोर्डचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. विल्यम्सनच्या गैरहजेरीत टॉम लॅथमकडे किवीज संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. हमिश रुदरफोर्ड लिसेस्टरशायरतर्फे कौंटी क्रिकेट खेळत होता. तेथून त्याला तातडीने किवीज संघात पाचारण करण्यात आले.
सर्वाधिक कसोटी खेळणारे इंग्लंडचे क्रिकेटपटू
जेम्स अँडरसन / 171 /2003 ते आतापर्यंत
ऍलिस्टर /161 /2006 ते 2018
स्टुअर्ट ब्रॉड /154 /2007 ते आतापर्यंत
ऍलेक स्टीवर्ट /133 /1990 ते 2003
जो रुट /119 /2012 ते आतापर्यंत.