वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येत्या मार्च एप्रिल दरम्यान होणाऱया महिलांच्या पहिल्याच प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गुजरात जायंटस संघाच्या मेंटरपदी भारताची माजी कर्णधार मिथाली राजची तसेच या संघाच्या क्रिकेट सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
40 वर्षीय मिथाली राजने आपल्या वैयक्तिक 23 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम केला आहे. मिथाली राजने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची निर्णय घेतला होता. महिला क्रिकेटला प्राधान्य मिळावे तसेच या क्रीडा प्रकाराचा विकास साधण्यासाठी मिथाली राजने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या मार्च-एप्रिल दरम्यान होणाऱया महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेसाठी अलीकडेच क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला होता. या स्पर्धेत सहभागी होणाऱया पाच संघांच्या फ्रांचायझीनी मोठय़ा रकमेच्या बोलीवर क्रिकेटपटूंना खरेदी केले होते. अदानी उद्योग समुहाचे तसेच अहमदाबादच्या फ्रांचायझीनी गुजरात जायंटस या संघासाठी 1289 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या स्पर्धेतील गुजरात जायंटस हा सर्वाधिक महागडा संघ म्हणून ओळखला जातो. आता या संघाच्या फ्रांचायझीनी मिथाली राजबरोबर नवा करार केला असून ती आता या संघाची मेंटर म्हणून कार्यरत राहिल.