23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सांगता, कारकिर्दीदरम्यान विक्रमी 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दुर्लक्षित खेळ म्हणून पाहिल्या जाणाऱया महिला क्रिकेटला ग्लॅमर मिळवून देणाऱया आणि जागतिक क्रिकेट खेळलेल्या महान महिला खेळाडूंपैकी एक असलेल्या मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत मिताली 10868 धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिने 232 वनडे सामन्यात 7805 धावा जमवल्या.
39 वर्षीत मितालीने 89 टी-20 सामने खेळले. त्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये ती फक्त 12 सामने खेळू शकली. मात्र, या सर्वोच्च क्रिकेट प्रकारात ती द्विशतक साजरे करण्यात यशस्वी ठरली. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावणारी ती एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
मिताली राजने 2019 मध्ये टी-20 क्रिकेट प्रकारातून खेळणे थांबवले. यंदा मार्चमध्ये भारताच्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेनंतर ती सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्त होणे अपेक्षित असल्याचे मानले जात होते. सदर आयसीसी मेगा इव्हेंटमध्ये तिने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते.
‘सर्वोच्च स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे हा सन्मान असतो. मी या प्रदीर्घ कारकिर्दीत यशाची अनेक शिखरे अनुभवली आणि काही वेळा उतारही अनुभवले. या प्रवासाची कुठे तरी सांगता होणारच होती. आज ते माझ्या कारकिर्दीत होते आहे. मी सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्त होत आहे’, असे मिताली ट्वीटरवर म्हणाली.
मूळ राजस्थानची असलेल्या मितालीने मागील 2 दशकात आपल्या फलंदाजीच्या बळावर महिला क्रिकेट गाजवण्यात अजिबात कसर सोडली नाही. तिने 1999 मध्ये भारतीय संघातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तिच्या पदार्पणावेळी महिला क्रिकेट हा दुर्लक्षित खेळ होता. पण, नंतर या खेळाला ओळख मिळवून देणाऱया काही अव्वल खेळाडूंमध्ये तिचाही आवर्जून वाटा राहिला.
‘मैदानात उतरले, त्या प्रत्येक वेळी मी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. भारतीय संघाला विजय मिळवून द्यायचा, हे एकच ध्येय माझ्यासमोर असायचे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेली अनेक वर्षे नेतृत्व सोपवले गेले, तो देखील मी माझा सन्मान मानते. मात्र आता सर्व क्रिकेट प्रकारातून पायउतार होण्याची वेळ आली आहे. सध्याच्या महिला संघात बरेच गुणवान क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे, भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असेल’, असे मिताली यावेळी आवर्जून म्हणाली.
मितालीने 6 वनडे विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून तिच्या खात्यावर सलग 7 अर्धशतकांचा विक्रम देखील नोंद आहे. पुरुष किंवा महिला गटात दोन विश्वचषक फायनल्समध्ये भारताचे नेतृत्व भूषवण्याची संधी लाभलेली ती एकमेव भारतीय कर्णधार आहे. 2005 व 2017 फायनल्समध्ये ती भारतीय संघाची कर्णधार होती.
2017 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने सर्वोच्च यश अनुभवले. पण, 5 वर्षांच्या कालावधीनंतर न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले, त्यावेळी मितालीच्या देदीप्यमान कारकिर्दीची यथोचित सांगता होणार नाही, हे स्पष्ट झाले.
-/ वनडे / टी-20 / कसोटी
सामने / 232 / 89 / 12
धावा / 7805 / 2364 / 699
सरासरी / 50.68 /37.52 /43.68
कोट्स
खूप कमी खेळाडूंना भारतीय संघातून खेळण्याची संधी लाभते. त्यातही एखाद्या खेळाडूने या सर्वोच्च स्तरावर 23 वर्षे खेळत राहणे अधिक दुर्मीळ ठरते. मिताली स्वतः भारतातील महिला क्रिकेटचा भक्कम आधारस्तंभ राहिली. शिवाय, तिने अनेक युवा खेळाडूंच्या कारकिर्दीला आकार दिला.
-राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण
कारकिर्दीच्या उत्तरार्धातही मिताली आपल्या सर्वोत्तम बहरात होती. इतके सातत्य राखणे कोणत्याही खेळाडूसाठी कठीण असते. भारतीय क्रिकेटसाठी तिने दिलेले योगदान अर्थातच लक्षवेधी आहे. मितालीचे खास अभिनंदन आणि दुसऱया इनिंगसाठी शुभेच्छा.
-माजी भारतीय फलंदाज वासिम जाफर
मिताली राजच्या कारकिर्दीतील माईलस्टोन्स
16 व्या वर्षी वनडे पदार्पणात नाबाद 114 धावांची खेळी
ऑक्टोबर 2019 मध्ये वनडे क्रिकेटमधील दोन दशके पूर्ण
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
कर्णधार या नात्याने महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रतिनिधीत्व
महिला कसोटीमध्ये द्विशतक झळकावणारी सर्वात तरुण खेळाडू
महिला क्रिकेटमध्ये वनडे प्रकारात सर्वाधिक अर्धशतके
पुरुष-महिला गटात दोन वनडे वर्ल्डकप फायनल खेळणारी एकमेव भारतीय.