मार्मिक, कल्पक, भन्नाट शेरेबाजीचा वर्षाव
जय नाईक /पणजी
राहूल गांधी यांच्या ’भारत जोडो’ ला सुरुंग लावत काँग्रेस आमदारांनी गोव्यात जो ’भाजप जोडो’ कार्यक्रम राबविला त्यातून राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. भाजपात आनंद तर काँग्रेसच्या गोटात संताप. समर्थकांमधून टाळ्या तर विरोधकांमधून टीका असे चित्र दिसून आले. अनेकांनी त्यानिमित्ताने स्वअंगीच्या कलेलाही वाट मोकळी करून देत कार्टून आणि अन्य माध्यमातून काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला.
बुधवारी सकाळी सकाळीच काँग्रेस आमदारांच्या भाजपप्रवेशाची बातमी व्हायरल झाली आणि राज्यात चर्चेला उधाण आले. काँग्रेस गोटात तर हा राजकीय भूकंपच ठरला. सकाळपासूनच व्हॉटस् ऍप, फेसबूक, यासारख्या विविध समाजमाध्यमांवरून सदरच्या बातम्या आणि त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया, टीका, टीपण्णी मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यातून एकीकडे राग व्यक्त करणारे तर दुसरीकडे मनोरंजन करणारेही दिसून आले.
देवांच्या शपथा, लोकासाठी वचननामे
मंगळवारपर्यंत काँग्रेसशी निष्ठावंत असलेले आठजण एका रात्रीत बदलतात आणि दुसऱयाच दिवशी पक्षप्रतारणा करून भाजपशी संग करतात ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. भरीस प्रत्येकाला याच आमदारांनी निवडणुकीपूर्वी मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारा यासारख्या धार्मिक स्थळांमध्ये परमेश्वराला साक्षी ठेऊन घेतलल्या एकसंधतेच्या शपथांचीही आठवण झाली. त्याशिवाय जमतेच्या दरबारात त्यांनी दिलेल्या वचननाम्याचेही स्मरण झाले. त्यामुळे अशा फटिंगपणाचा वचपा काढण्यासाठी आणि स्वतःमधील संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी अनेकांनी विविध समाजमाध्यमांचा आधार घेतला.
’हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे’
त्यातून कुणी त्यांचे मंदिरातील शपथ घेतानाचे व्हीडिओ पुनः प्रसारित केले, तर कुणी काँग्रेसचा ’हात’ आणि भाजपचे ’कमळ’ यांचा संयोग घडविलेले चित्र व्हायरल केले. त्याही पुढे जाताना काहींनी काँग्रेसचे आठही आमदार ’हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे’ या प्रसिद्ध गाण्याच्या तालावर जल्लोषात नाचतानाचा कार्टून व्हिडीओ बनविला. काहींनी त्याला शिमग्यातील ’शबय’ म्हणुनही संबोधले.
पणजीतील महालक्ष्मी मंदिरात या आमदारांना शपथ देणाऱया भटमामाचीही अनेकांनी कीव केली. ’बिचारा भटमाम त्रासात पडला’, अशा टीपण्ण्या वाचण्यास मिळाल्या. काही जणांनी ’हे सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांनाच घरी पाठवणार तर नाही ना? अशी मार्मिक भीती व्यक्त करणारे पोस्ट टाकले.
युरी आलेमाव ’नॉट फॉर सेल’
असा सर्वत्र गोंधळ चाललेला असला तरीही काहीजण काँग्रेसशी निष्ठावान राहिलेल्यांनाही विसरले नाहीत. युरी आलेमाव यांनी ’मी काही विकाऊ वस्तू नाही’ म्हणुन केलेले वक्तव्य ’नॉट फॉर सेल’ चा लेबल लावून प्रचंड व्हायरल करण्यात आले आहे.
एकाने तर या आमदारांना कुर्ल्यांची उपमा दिली. बाजारातून आणलेल्या कुर्ल्या त्यांने एकमेकांशी घट्ट बांधून ठेवल्या आहेत. त्याबद्दल कुणीतरी त्याला विचारतो. त्यावर उत्तर देताना तो म्हणतो, ’यांना मुक्त सोडले तर कधी हातातून निसटून जातील सांगता येत नाही’. अशी मजेशीर कमेंट देण्यात आली आहे.
अन्य एकाने आता ’विजय’ केव्हा? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर दुसऱयाने ’विजया दशमीला’ असे मनोरंजक उत्तर दिले आहे. तिसऱयाने त्याही पुढे जाताना, तो ’फॉरवर्ड जावे’ की ’बॅकवर्ड यावे’ या विवंचनेत असल्याची कल्पक टीपण्णी केली आहे.
या माध्यमांवरून सर्वाधिक कमेंटस् दिगंबर कामत यांच्यावर देण्यात आल्या आहेत. त्यांच्या ’आय बिलिव्ह इन ’गॉड’ या शब्दांमधून भलताच अर्थ काढत ’गॉड’ च्या जागी गुळाची ढेप (कोकणीत गॉड) दाखविली आहे. त्यातून भाजप म्हणजे ’गुळाची ढेप’ असून तिच्याकडे ते आकर्षित झाले असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
’पितृपक्षात’ करण्यात आलेल्या या पक्षांतरावरही अनेकांनी मार्मिक भाष्य केले असून ’एकाचवेळी आठ जण गेले रे!’ म्हणत त्याचा संदर्भ नको तेथे नेण्याची भन्नाट कल्पकताही काहींनी दाखविलेली दिसून आली. ’जाणाऱयांना एक… नाही ती नाही, घेणारेही त्याच माळेचे का? असा सवालही एकाने उपस्थित केल्याचे वाचनात आले.