महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा
कोल्हापूर / प्रतिनिधी
वाडीडवस्तीवरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नयेत याबाबत 20 पटाखालील शाळा बंद करू नयेत यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांची पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असता सदर शाळा बंद होऊ नयेत यासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी बैठकही लावून पट संख्या अभावी शाळा बंद न करण्याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.
वाडीवस्तीवर जन्म होणे हा त्या बालकाचा दोष नसून त्यालाही दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. बालकांचा शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा 2009 नुसार ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना १ कि मी अंतरा पर्यंतच्याच शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार असताना वाड्या वस्त्यांवरील 20 पटाखालील शाळा बंद करण्याचा अधिकार शासनास नाही. तरीसुध्दा शासन या शाळा बंद करण्याचा प्रयत्न करू पाहत आहे . वाड्या वस्त्यांवरील शाळांतील मुलांना जवळच्या मोठ्या शाळेत जायचे झाले तर किमान पाचदहा कि मी अंतरापर्यंत शाळा नाहीत, वाहतुकीच्या पुरेशा सुविधा नाहीत त्यामूळे अशा शाळा बंद करू नयेत अशी विनंती आमदार आबिटकर यांच्याकडे करण्यात आली. अशा शाळा बंद करू नयेत यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, तानाजी पावले, रंगराव वाडकर, पी आर पाटील, अशोक भांदिगरे, एन.एस. पाटील, आर.एस. पाटील, आनंदा साळोखे, शामराव शेटके, संजय कुदळे, अमोल हेगडे आदी उपस्थित होते.