मोरपिर्ला पंचायत व केपे भाजप मंडळाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत टीका : लोकांची दिशाभूल करू नये
वार्ताहर /केपे
माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या प्रयत्नांमुळे केपे मतदारसंघात विकासकामांना चालना मिळाली असून काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काहींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी करू नये, असे मोरपिर्ला पंचायतीचे माजी सरपंच व केपे भाजप मंडळाचे सचिव खुशाली वेळीप यांनी म्हटले आहे.
मोरपिर्ला येथे केपे भाजप मंडळ व मोरपिर्ला पंचायत यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, सरपंच तुळशीदास वेळीप, उपसरपंच मनीषा वेळीप, पंच दिनेश गावकर, बाबुसो वेळीप व इतर हजर होते. पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे एल्टन डिकॉस्ता हे येथे एका कार्यक्रमात आले होते. तेथे बोलताना ते कूपनलिकेचे उद्घाटन, रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण व इतर कामे जी पूर्ण झाली आहेत वा ज्यांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले, असे खुशाली वेळीप यांनी सांगितले.
खरे म्हणजे कोणीही आमदार झाले किंवा पंतप्रधानांना पत्र लिहिले म्हणून दुसऱयाच दिवशी त्या कामाला सुरुवात होऊ शकत नाही. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मी स्वतः 15 वर्षे पंच होतो. कोणत्याही कामाचा अंदाजित खर्च तयार करण्यात व ती प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यात पाच ते सहा महिने जातात व निविदा प्रक्रिया मार्गी लागण्यात सहा-सात महिने जातात. कोणतेही काम एक महिन्यात होऊ शकत नाही. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांचे श्नेय एल्टन यांनी घेऊ नये आणि लोकांची दिशाभूल करू नये, असे ते म्हणाले.
मोरपिर्ला पंचायत क्षेत्रात जी विविध विकासकामे चालू आहेत व ज्यांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत ती सुमारे 150 कोटींची कामे आहेत. या कामांचे श्नेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत व माजी उपमुख्यमंत्री कवळेकर यांना जाते. आमदार डिकॉस्ता यांनी नवी कामे मार्गी लावावीत व त्या कामांचे श्नेय घ्यावे, असे खुशाली वेळीप यांनी सांगितले. जी कामे चालू आहेत किंवा ज्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत त्यांच्या पलीकडे कोणती कामे सुरू केली आहेत ते आमदार डिकॉस्ता यांनी दाखवावे. शक्य असेल, तर त्यांनी नव्या कामांचे अंदाजित खर्च तयार करून ते लोकांसमोर ठेवावेत, असे तुळशीदास वेळीप यांनी सांगितले.
जी विकासकामे माजी आमदारांनी राबविली होती त्या कामांचे उद्घाटन करताना विद्यमान आमदार या नात्याने मी उद्घाटन करत आहे, असे डिकॉस्ता यांनी सांगावे. भाजप सरकारमुळेच ही कामे झाली आहेत. तसेच माजी आमदारांनी केलेल्या कामांचे उगाच त्यांनी श्रेय घेऊ नये. मोरपिर्ला कूपनलिका, बार्से कूपनलिका व बेंदुर्डे येथे जायकाच्या अंतर्गत पाणीपुरवठय़ाचे काम या तीन कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘जायका’च्या योजनेद्वारे पाणी आणणे व ते पाईपमधून पोहोचविणे यासाठी जे कष्ट घ्यावे लागले आहेत ते फक्त नळ फिरविला व पाणी पडले इतक्मयापुरते मर्यादित नाहीत. ती सर्व प्रक्रिया जाणून घ्यावी, असे संजय वेळीप यांनी सांगितले.