क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
कुळे-शिगांव येथे लवकरच सुसज्ज असे मैदान बांधण्यात येईल, अशी माहिती आमदार गणेश गावकर यांनी मारीयम्मा स्पोर्टस् क्लबने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना दिली.
यावेळी कुळे शिगांवचे सरपंच मच्छिद्र देसाई, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, पत्रकार एकनाथ खेडेकर, हरिष काकोडकर, उल्हास देसाई, मुरूगन गवंडर, प्रणव देसाई, रामदास देसाई, प्रितम साळस्कर आदी उपस्थित होते. गणेश गावकर पुढे म्हणाले सावर्डे मतदारसंघात इतर ठिकाणी मैदाने आहेत. कुळे शिगांव येथे मैदान होण्यासाठी खेळाडूंची मागणी आहे ती लवकरच पुर्ण करण्यात येईल. खेळामुळे गावात एकोपा राहतो व शरीर तंदुरूस्त राहते असे ते पुढे म्हणाले. मच्छिद्र देसाई यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. स्पर्धेतील विजेते धारबांदोडा शिवडे संघाला रू. 15000 व चषक तसेच इतर विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हनुमंत नाईक यांनी केले. शिवानंद बुदनूर यांनी आभार मानले.