ऑनलाईन टीम / मुंबई :
ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक (ganesh naik) यांनी रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप दीपा चौहान (deepa chouhan) या महिलेने केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 15) रात्री सीबीडी पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरोधात शस्त्र अधिनियम 30 आणि कलम 417 व 506 (2) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
दीपा चौहान या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, मागील 27 वर्ष मी गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे. आम्हाला एक 15 वर्षांचा मुलगाही आहे. नाईक या मुलाला स्विकारण्यास नकार देत आहेत. त्यांनी मार्च 2021 मध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून मला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आमदारांच्या कार्यकर्त्यांपासून आमच्या जीवाला धोका असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी संबंधित महिलेने केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने अदखलपात्र गुन्हा दाखल करून तिला 24 तास संरक्षण दिले आहे.
दरम्यान, चौहान यांनी राज्याच्या महिला आयोगाकडेही यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर महिला आयोगाकडूनही नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. माझा मुलगा मोठा झाला आहे. त्याच्या भविष्यासाठी संबंधित आमदाराच्या इतर मुलांप्रमाणेच त्यालाही मालमत्तेत समान वाटा मिळावा, असा आग्रह या महिलेने पोलीस आणि महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत धरला असल्याचे सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.