मतदारांना वाटप करण्यासाठी जमा केलेले साहित्य जप्त : वाणिज्य कर विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी मंत्री आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य आर. शंकर यांच्या राणेबेन्नूर शहरातील निवासस्थानावर वाणिज्य कर विभागाने छापा टाकला. हावेरी वाणिज्य कर आयुक्त शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मतदारसंघातील नागरिकांना वाटप करण्यासाठी जमा केलेल्या अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आर. शंकर यांचे चित्र असणारे साड्यांचे बॉक्स, ताट-तांब्या आणि स्कूल बॅग जप्त करण्यात आले आहेत. निवडणुकीआधी मतदारांना आमिष म्हणून या वस्तू वाटप करण्यासाठी आणल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
छाप्यावेळी अधिकाऱ्यांनी आमदार आर. शंकर यांच्या निवासस्थानी आढळून आलेल्या वस्तू आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. चौकशीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त नारायण रे•ाr यांनी राज्य सरकारकडे अहवाल सादर केला.
6 हजारहून अधिक साड्या, 9 हजारपेक्षा अधिक स्कूल बॅग तसेच मतदारांना वाटप करण्यासाठी जमा केलेले ताट-तांब्या, जवळपास 30 ते 40 लाखांच्या गृहोपयोगी वस्तू असा एकूण 8 कोटींच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर वाणिज्य कर अधिकाऱ्यांनी या वस्तू पोलिसांच्या ताब्यात दिल्या. सुमारे सात तास अधिकाऱ्यांनी आर. शंकर यांची चौकशी केली. त्यांच्याजवळ अधिकाऱ्यांनी वस्तूंची जीएसटी बिले मागितली आहेत. ती सादर करण्यासाठी शंकर यांनी वेळ मागितली आहे.
समर्थकांची निवासस्थानासमोर निदर्शने वाणिज्य कर अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकल्याची माहिती मिळताच आर. शंकर यांचे चाहते आणि समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. आर. शंकर यांचा विजय निश्चित असल्याने अनेक राजकारण्यांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे छाप्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. आपल्या नेत्याजवळ आढळून आलेल्या वस्तुंची बिले आणि कागदपत्रे आहेत. अधिकाऱ्यांजवळ ती सादर करण्यात येतील, असे आर. शंकर यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.