Tarun Bharat

आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून 4 तास चौकशी

मालमत्ता, गेल्या 20 वर्षांतील उत्पन्न व खर्च यांचा मागितला तपशील

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राजकीय उलथापालथीनंतर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे कोकणातील आमदार  लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रडारवर आलेले आहेत. त्यामध्ये कणकवली-कुडाळचे  आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एकदा लाचलुचपत कडून नोटीस मिळाली आहे. सोमवारी 5 डिसेंबरला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग कार्यालयात हजर राहण्याच्या दिलेल्या नोटीसीनुसार ते स्वतःसह पत्नी व भाऊ या तिघांची चौकशी करण्यात आली. सुमारे 4 तास झालेल्या चौकशीनंतर आणखी काही पुरावे पुढील चौकशीसाठी सादर करण्याच्या सूचना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिल्या आहेत.

   आमदार वैभव नाईक यांच्यानंतर राजापूर-लांजाचे आमदार राजन साळवी यांना देखील लाचलुचपतची नोटीस आली आहे. या नोटिसीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे. याआधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी  नाईक यांना नोटीस पाठवली होती. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी यापूर्वीच लाचलुचपत कार्यालय रत्नागिरीला मेल करत यापूर्वीच वेळ मागून घेतला होता. नाईक यांनी त्यानंतर कुडाळ इथल्या लाचलुचपतच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता.

   सन 2002 ते 2022 कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतचा तपशील देण्याचे नाईक यांना एसीबीने आदेश दिले आहेत. आमदार नाईक यांच्या मालमत्तेबाबत केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांसहित व जबाब नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी विभागामार्फत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नाईक आपल्या पत्नी व बंधू यांच्यासह सोमवारी रत्नागिरीत चौकशीसाठी हजर राहिले.

   रत्नागिरीत आल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. त्यानंतर आमदार साळवी हे आमदार नाईक यांच्यासोबत लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात दाखल गेले. दुपारी 12.30 वा. चौकशी सुरु झाल्यानंतर आमदार साळवी आपल्या घरी परतले.  त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. आमदार वैभव नाईक, त्यांच्या पत्नी व भावाचे म्हणणे अधिकाऱयांनी नोंदवून घेतले. 9 डिसेंबर रोजी आणखी काही पुरावे सादर करण्याच्या सूचना पुढील चौकशीसाठी करण्यात आल्या आहेत. पण सध्या मागच्या काही राजकीय घडामोडी, नोटीस आणि या आमदारांची सुरू झालेल्या चौकशीवरून विविध चर्चांना ऊत आला आहे.

चौकशीमागे राजकीय हेतू आणि नारायण राणेंचाच हातवैभव नाईक

रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या नोटीसीनुसार आपल्या सर्व उत्पन्नाचे मार्ग व कौटुंबिक माहिती या विभागाला दिलेली आहे. तसेच त्यासंदर्भातील लेखी पुरावेही सादर केले आहेत. सन 1996 पासून मी व्यवसाय करत आहे. वयाच्या 18-21 व्या वर्षापासून व्यवसायात असून त्यासंदर्भात आयकरही नियमित भरत आहे. गेली 27-28 वर्ष मी करत असलेल्या व्यवसायाचे उत्पन्न दाखवलेले आहे. आपली वडिलोपार्जित असलेल्या मालमत्तेचा सारा तपशील दाखवण्यात आल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी झालेल्या चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

    या सुरू झालेल्या चौकशीमुळे त्यांनी सांगितले की, यामागे राजकीय हेतूने आपली चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. त्याबाबत भालेकर यांनी जरी तक्रार दिलेली असली तरी त्या तक्रारीमागे राणे कुटुंबिय असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी बोलताना केला आहे .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यालये ही प्रत्येक जिह्यात आहेत. परंतु स्थानिक अधिकाऱयांवर सरकारचा विश्वास नसल्याने मला रत्नागिरीत तर आमदार साळवी यांना अलिबागला चौकशीसाठी बोलावले गेले. हा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न असून आपण यात दबणार नसल्याचेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

 आपण कोणतीही आदळआपट करणार नाही. त्याला आपण जरूर उत्तर देउ, पण ही सुरू असलेली चौकशी अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय हेतूने सुरू असलेल्या चौकशीबाबत ते म्हणाले की, कोकणात उध्दव ठाकरे शिवसेना आजही भक्कम आहे. त्यामुळे येथे जे आमदार उध्दव ठाकरे गटात राहिले आहेत. तयांना त्रास देण्याचा या चौकशीमागे हात आहे. त्यात नारायण राणें यांचाच हात आहे. राणेंची भूमिका राजकीय विरोधक आहे, ती त्यांना करू दय़ा. पण त्यांना त्याच पध्दतीने उत्तर देउ असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.  

Related Stories

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रुपेश अहिर

NIKHIL_N

..अन् जुन्या आवडींना सवड मिळाली!

Patil_p

मुंबई-गोवा महामार्ग 20 तास ठप्प

Patil_p

कुडाळ तहसीलदारांवर हल्ल्याचा प्रयत्न

NIKHIL_N

भरवस्तीतील कॅमेऱ्यात दोन बिबटे कैद

Anuja Kudatarkar

भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात ऋतिक सावंत याची निवड

Anuja Kudatarkar