योजनेंतर्गत पोशाख वितरणप्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /खानापूर
मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असताना ग्रामीण भागातील रोजगार समस्यांचे निवारण करण्यासाठी मनरेगा योजना सुरू केली होती. या योजनेमुळेच ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सुटण्याबरोबरच विकासालाही चालना मिळाली, असे प्रतिपादन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर येथे मनरेगा योजनेंतर्गत शंभर दिवसांहून अधिक काम केलेल्या मनरेगा 2800 कामगारांना सरकारतर्फे पोशाखाचे वितरण करताना व्यक्त केले.
खानापूर येथील पाटील गार्डनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोंढा ग्रा. पं. विकास अधिकारी बलराज बजंत्री यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.
यावेळी बोलताना आमदार निंबाळकर म्हणाल्या, मनरेगा योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला रोजगाराची संधी मिळाली. विशेष म्हणजे एखादा ग्रा. पं. सदस्यदेखील मनरेगा योजनेचा लाभ घेऊ शकतो. तालुक्यात बऱयाच ग्रा. पं. सदस्यांनी मनरेगा योजनेचा लाभ घेतला. यामुळे ग्रामीण भागातील शेततळी, लहान-सहान रस्ते, वनक्षेत्रात वृक्षारोपण यासारखी कामे पूर्ण झाली.
कार्यक्रमाला तहसीलदार प्रवीण जैन, ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर, तालुक्यातील पंचायत विकास अधिकारी तसेच मनरेगा योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. यावेळी शंभर दिवसांहून अधिक काम केलेल्या मनरेगामधील प्रत्येक कामगाराला शासनाच्यावतीने टी-शर्ट, टोपी तसेच डॉ. अंजली फाऊंडेशनवतीने टिफीन डब्याचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन पंचायत विकास अधिकारी आनंद भिंगे यांनी केले. पंचायत विकास अधिकारी प्रभाकर भट यांनी आभार मानले.