ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवाजी पार्क परिसरात ‘महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा होणार आहे. या मेळाव्याचा टीझरही जारी करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. यापूर्वी 9 मार्चला मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणे टाळले होते. त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर राजकीय भाष्य करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ते आज आपल्या भाषणातून कोणावर निशाणा साधणार याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.
अधिक वाचा : राज्यात तुरळक पावसाचा अंदाज
दरम्यान, या मेळापूर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे हे बॅनर आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. शिवसेना भवनासमोरही हे बॅनर लावण्यात आले असून, एकप्रकारे शिवसेनेच्या ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.