ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज एक जुनी गोष्ट आठवली. जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेले सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते. काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्यावेळी आस्वाद घेत असतील. फक्त राज ठाकरेच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिम्मत असणं यातला फरक आहे.”
स्थानिक नेत्यांचा विरोध आणि तब्बेतीच्या कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढे ढकण्यात आला आहे. अयोध्या दौऱ्यासाठीही नेतेमंडळींमध्ये चढाओढ सुरू होती. राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी आदित्य ठाकरे अयोध्येला गेल्याने मनसे नेत्यांकडून आदित्य ठाकरेंवर टीका होत असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, आदित्य ठाकरे काही वेळापूर्वी लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. तेथून ते मोटारीने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून 10 ते 12 हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. दिवसभरातील भरगच्च कार्यक्रम झाल्यानंतर रामलल्लांचे दर्शन घेऊन आदित्य ठाकरे सायंकाळी शरयू तीरावर आरती करणार आहेत. त्यामुळे तिथेही शिवसैनिकांचे जथ्थे जमायला सुरूवात झाली आहे.