ऑनलाईन टीम / मुंबई :
मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी ठाकरे सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपला. त्यामुळे या भोंग्यांविरोधात आंदोलन करण्याच्या प्रयत्नात मनसैनिक आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील पोलिसांना चकवा देत होते. मात्र, देशपांडे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या बंगल्याबाहेर मीडियाशी बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देशपांडे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदीप देशपांडे (sandeep deshpande) आणि संतोष धुरी (santosh dhuri) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले.
संदीप देशपांडे आणि संदीप धुरी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी दाखल झाले होते. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशपांडे आणि धुरी यांनी मीडियाशी बोलताना चालत जाण्याचा बहाणा केला. याच क्षणी देशपांडे यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन पोहोचला. पोलीस पाठीमागे पळत असतानाचा देशपांडे आणि धुरी गाडीत बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.