ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या (रविवारी) पुण्यात सभा होणार आहे. मनसेकडून या सभेची जोरदार तयारी सुरू असून, सभेपूर्वीच पुण्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. मनसेला धक्का देण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेदिवशीच मनसेचे 20 पदाधिकारी शिवबंधन हाती बांधणार आहेत. शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे यांची रविवारी (22 मे) सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे सभा होणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेला 5 जूनचा अयोध्या दौरा राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव स्थगित केला आहे. यासंदर्भातील पुढची भूमिका राज ठाकरे उद्याच्या सभेत जाहीर करणार आहेत. त्यामुळे या सभेला मनसैनिकांनी यावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने राज ठाकरेंच्या या सभेदिवशीच मनसेला मोठा धक्का देण्याची खेळी केल्याचे समजते.
मशिवरील भोंग्यांच्या मुद्यावरुन राजकारण पेटल्यानंतर मनसेला गळती लागली आहे. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. नगरसेवक वसंत मोरे यांनाही शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले आहे. शिवाजीनगरचे विभागअध्यक्ष रणजीत शिरोळे यांनीही बैठकांना बोलवत नसल्याची तक्रार केली होती. त्या नाराजीतून मनसेचे पदाधिकरी एकमेकांना भिडले होते.