ऑनलाईन टीम / मुंबई :
मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसे (mns) आक्रमक झाली असून, सरकारला 3 मे पर्यंत त्यांनी अल्टीमेटम दिला आहे. त्यावरुन शिवसेना आणि मनसेत कलगीतुरा रंगला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राज ठाकरेंची तुलना ओवैसींसोबत केली. तसेच राज ठाकरे म्हणजे भाजपचा भोंगा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरुन मनसेने सामना कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी करत राऊतांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
”ओवैसी कोणाला बोलता? संजय राऊत तुमचा कर्कश भोंगा बंद करा. याचा त्रास संपुर्ण महाराष्ट्राला होतोय. नाहीतर मनसे स्टाईल तुमचा भोंगा आम्ही बंद करू” असा इशारा या पोस्टरमधून देण्यात आला आहे. तसेच या पोस्टरवर मनसेकडून राऊतांच्या पल्टी झालेल्या गाडीचा फोटोही टाकण्यात आला आहे.
संजय राऊत मनसेच्या स्थापनेआधी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर आले होते. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणा दिल्या. आणि काही वेळाने त्यांची गाडी पल्टी करण्यात आली होती. हा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असाही सवाल या पोस्टरवर करण्यात आला आहे.