पुणे / प्रतिनिधी :
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला लोणीकंद पोलिसांनी अटक केले. चौकशीत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 53 लाखांचे 197 ॲपल कंपनीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. चोरटय़ांनी हे मोबाईल वाघोली परिसरातील गोदामातून चोरी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
अब्दुल हाय अबुजार शेख (वय 20), अबेदुर मुफजुल शेख (वय 34) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुलतान अब्दुल शेख (वय 32) अबुबकर अबुजार शेख (वय 23) राबीवुल मुंटू शेख (वय 22, सर्व रा. झारखंड) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. केसनंद रस्त्यावर पाच-सहाजण मंगळवारी रात्री दरोडय़ाच्या तयारीत थांबल्याची माहिती पोलीस नाईक विनायक साळवे आणि कैलास साळुंके यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निखिल पवार, उपनिरीक्षक सुरज गोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत टोळक्यापैकी अब्दुल आणि अबेदुर यांना ताब्यात घेतले. त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
हेही वाचा : निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी, शिवेंद्रसिंहराजेंची टीका