गावात घरोघरी सोलर पॅनल, गावकऱयांचे वीजबिल अर्ध्यावर येणार
मोढेरा / वृत्तसंस्था
गुजरातमधील मोढेरा हा गाव सूर्यमंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. संरक्षित पुरातत्व स्थळ असलेल्या या गावात आणखी एक मोठी उपलब्धी निर्माण झाली आहे. मोढेरा हा सौरऊर्जा प्रणालीने सुसज्ज बनलेला देशातील पहिला गाव ठरला आहे. हा गाव संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. रविवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक नोंदीची घोषणा केली. यासोबतच मोदींनी गावात 3,900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली. आता संपूर्ण गावात सौरऊर्जेवर चालणाऱया थ्री-डी प्रोजेक्शनची सुविधाही येथे उपलब्ध होणार आहे.
प्राचीन सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील मेहसाणा जिह्यातील मोढेरा गावाच्या नावात आणखी एका यशाची भर पडली आहे. मोढेरा येथील प्रत्येक घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाला 24 तास सोलर पॅनलची वीज मिळत आहे. मेहसाणा जिह्यापासून 25 किमी अंतरावर असलेल्या मोढेरा गावात ग्राउंड माउंटेड सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. वीज निर्मितीसाठी गावातील प्रत्येक घराच्या छतावर एक किलोवॅट क्षमतेचे सोलार पॅनल आणि सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे. या सर्व सौर यंत्रणा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टमशी जोडलेल्या आहेत.
वीज बिलात मोठी बचत
मोढेरा गावात आता दिवसभर सौर पॅनेलद्वारे वीज पुरविली जाईल. तर सायंकाळनंतर भारतातील पहिली ग्रीड-कनेक्टेड मेगावॅट किंवा स्केल बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली घरांना वीज पुरवेल. यासाठी केंद्र आणि गुजरात सरकारने सौर विकास प्रकल्पात दोन टप्प्यात 80 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पामुळे मोढेरा हे सौर पॅनेलमधून वीज निर्माण करणारे भारतातील पहिले गाव ठरले. या सौरप्रकल्पामुळे गावकऱयांची वीजबिलात 60 ते 100 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात विकसित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 12 हेक्टर जागा दिली होती.
मोढेरा सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध
सूर्य मंदिर 1026-27 मध्ये चालुक्मय वंशाचा राजा भीम-प्रथम याने बांधले होते. येथे टेकडीवर सूर्यमंदिर बांधण्यात आले आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे मंदिरावर पडतील अशा पद्धतीने हे बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या भिंतींवर नक्षीकामाच्या साहाय्याने पौराणिक कथांचे चित्रण केले आहे. मंदिराचे सूर्य कुंड, सभा मंडप आणि गुड्डा मंडप असे तीन भाग आहेत. तलावावर जाण्यासाठी पायऱया करण्यात आल्या आहेत. कुंडाचे नाव रामकुंड आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली असून येथे पूजा करण्यास मनाई आहे.
मेहसाणा पासून 25 कि.मी. अंतर
गुजरातमधील मेहसाणा गावापासून 25 किलोमीटर अंतरावर मोढेरा गाव आहे. तसेच राजधानी गांधीनगरपासून त्याचे अंतर सुमारे 100 किमी आहे. पुष्पावती नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे 2,436 हेक्टर आहे. गुजरात सरकारने मोढेरामध्ये सौर प्रकल्प विकसित करणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. नवीकरणीय ऊर्जा विकसित करणारे हे भारतातील पहिले गाव बनवून त्यांना अक्षय ऊर्जेचा वापर करून तळागाळात लोकांना कसे सक्षम बनवले जाऊ शकते हे दाखवायचे आहे.
पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही हा प्रकल्प अतिशय खास आहे. 2030 पर्यंत भारताच्या ऊर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण केल्या जाव्यात, असा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे. हा प्रकल्प पंतप्रधानांचा हा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. असे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले. स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मितीचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुजरातने पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे याचा मला आनंद आहे, असेही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.