गावात घरोघरी सोलर पॅनेल, देशातील पहिले सौरगाव, ‘सूर्यमंदिर’स्थित गावाला नवी ओळख
प्राचीन सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील मेहसाणा जिह्यातील मोढेरा गावाचा लौकिक देशभर वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मोढेराला भारतातील पहिले 24ƒ7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले. येथील प्रत्येक घराच्या छतावर सोलर पॅनेल बसविल्यामुळे संपूर्ण गावाला 24 तास सोलर पॅनेलची वीज मिळणार आहे. साहजिकच सौरऊर्जा प्रणालीने सुसज्ज बनलेला हा देशातील पहिला गाव आता संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. पूर्वी मोढेरा हे गाव सूर्य मंदिरामुळे सुपरिचित होते. परंतु आता मोढेरा सूर्य मंदिरापासून प्रेरणा घेऊन ‘सोलर व्हिलेज’ बनले आहे. आता या गावाची सूर्यमंदिर आणि सोलर व्हिलेज या दोन्ही बिरुदावलींनी नवी ओळख बनणार आहे. भविष्यात जेव्हा सौरऊर्जेबाबत चर्चा होईल, तेव्हा सर्वात आधी देशात मोढेराचे नाव घेतले जाईल. सरकारच्या अशा सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी मोढेरा हे गाव एक पायलट प्रोजेक्ट म्हणून नावारुपाला येऊ शकते.
गुजरात सरकारने मोढेरामध्ये सौर प्रकल्प विकसित करणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. नवीकरणीय ऊर्जा विकसित करणारे हे भारतातील पहिले गाव बनवून त्यांना अक्षय ऊर्जेचा वापर करून तळागाळातील लोकांना कसे सक्षम बनवले जाऊ शकते, हे दाखवून दिले आहे. मेहसाणा जिह्यातील मोढेरा जिह्यापासून 25 किमी अंतरावर असलेल्या मोढेरा गावात ग्राऊंड माऊंटेड सोलर पॉवर प्रोजेक्ट स्थापित करण्यात आला आहे. वीज निर्मितीसाठी गावातील 1,300 घरांच्या छतावर एक किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनेल आणि सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. या सर्व सौर यंत्रणा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमशी जोडलेल्या आहेत. या सुविधेमुळे दिवसा घरे सौर पॅनेलद्वारे चालविली जातील. तर सायंकाळनंतर भारतातील पहिली ग्रीड-कनेक्टेड मेगावॅट किंवा स्केल बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली घरांना वीज पुरवेल. सौरऊर्जेच्या या प्रकल्पात दक्षिण कोरियाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या या गावाला ताशी केवळ 10 हजार युनिट वीज लागणार असल्याचे मानले जात आहे. तर सौरग्राम प्रकल्पातून सुमारे प्रतितास 1.50 लाख युनिट वीज मिळू शकते. या गावातील सर्व घरे 24 तास सौरऊर्जेने उजळणार आहेत.
गावकऱयांचे वीजबिल अर्ध्यावर येणार
केंद्र आणि गुजरात सरकारने सौर विकास प्रकल्पात दोन टप्प्यात 80.66 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात विकसित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 12 हेक्टर जागा दिली होती. या
प्रकल्पामुळे मोढेरा हे सौर पॅनेलमधून वीज निर्माण करणारे भारतातील पहिले गाव ठरले. या सौर प्रकल्पामुळे गावकऱयांची वीजबिलात 60 ते 100 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत घरोघरी सौरदिवे झळकतील. हा सौर प्रकल्प 6 मेगावॅटचा असून 15 एमडब्ल्यूएच बॅटरी बॅकअप सुविधाही आहे. मोढेरा गावात वाहनांसाठी सोलर चार्जिंग स्टेशनही बांधण्यात आले आहे. मोढेरा येथे स्मार्ट एनर्जी मीटर बसवण्यात आले असून स्मार्ट एनर्जी सेंटरही बांधण्यात आले आहे.
मेहसाणा पासून 25 कि.मी. अंतर
गुजरातमधील मेहसाणा गावापासून 25 किलोमीटर अंतरावर मोढेरा गाव आहे. तसेच राजधानी गांधीनगरपासून त्याचे अंतर सुमारे 100 किलोमीटर आहे. पुष्पावती नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे 2,436 हेक्टर आहे.
‘हरित भारत’चे ध्येय गाठण्यासाठी मदत
2030 पर्यंत भारताच्या ऊर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण केल्या जाव्यात, असा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे. मोढेरा हा सौरप्रकल्प पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. 2030 पर्यंत हरित भारत बनवण्याचे लक्ष्य निश्चित करून ऊर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सौरऊर्जेच्या वापरासाठी ग्राहकांना प्रतियुनिट फक्त 1.99 रुपये खर्च करावे लागतात. संपूर्ण जगाच्या तुलनेत सौरऊर्जेच्या उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. आजवर असे असायचे की सरकार वीज निर्माण करायची आणि जनता ती विकत घ्यायची. केंद्र सरकार लोकांना त्यांच्या घरात सोलर पॅनेल बसविण्यासाठी आग्रह करायचे. मात्र, आता मोठय़ा प्रकल्प उभारणीतही सरकारकडून सहकार्य केले जात आहे. आता त्यापुढे जाऊन देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जात आहे.
‘सौर व्हिलेज’चे फायदेः
घरोघरी सोलर पॅनेल बसविल्यामुळे स्वस्तात वीजनिर्मिती
ग्रामस्थांच्या वीजबिलात 60 ते 100 टक्के बचत होणार
शेतीपासून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगपर्यंत सुविधा उपलब्ध
शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार
अतिरिक्त सौरवीज सरकारला विकून गावाला अर्थप्राप्ती
पर्यटनाशी संबंधित सुविधा वाढून रोजगार संधी वाढणार
सूर्यमंदिरातील थ्री-डी प्रोजेक्शनची
पर्यटकांना पडणार भुरळ …
मोढेरा हे गाव ऐतिहासिक सूर्य मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दरवषी हजारो पर्यटक येतात. हे पर्यटक सूर्यमंदिरातील कलाकुसर पाहून थक्क होतात. आता सौर प्रकल्पाच्या मदतीने या मंदिराचे सौंदर्य अधिकच वाढविण्यात आले आहे. हे मंदिर हेरिटेज लायटिंग आणि थ्री-डी प्रोजेक्शनने सुसज्ज आहे. ही व्यवस्था पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. सौरऊर्जेचा फायदा केवळ स्थानिक गावकऱयांनाच होणार असे नाही. तर मोढेरा हे पर्यटनस्थळ बनविण्याचीही योजना आहे. त्यासाठी मोढेरा सूर्य मंदिरात सौरऊर्जेवर चालणारे थ्री-डी प्रोजेक्शन करण्यात आले आहे. येथे येणाऱया पर्यटकांना दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत याचा आनंद घेता येणार आहे. तसेच नजीकच्या काळात पर्यटकांना मोढेराच्या इतिहासाची इत्यंभूत माहिती देण्याच्या दृष्टीने विविध अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचाही प्रशासनाचा विचार आहे.
सूर्यमंदिरासाठी मोढेरा प्रसिद्ध
ओडिशातील कोणार्क सूर्यमंदिराविषयी सर्वांना माहिती आहे. पण बहुतेक लोकांना गुजरातच्या प्राचीन सूर्यमंदिराबद्दल माहिती नसेल. अहमदाबादपासून 100 किमी अंतरावर मेहसाणा जिह्यातील मोढेरा गावात पुष्पावती नदीच्या काठावर एक भव्य आणि विशाल सूर्यमंदिर आहे. हे 1026-27 मध्ये सोलंकी किंवा चालुक्मय वंशाचा राजा भीम प्रथम याने बांधले होते.
मोढेरा येथे टेकडीवर सूर्यमंदिर बांधण्यात आले आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे मंदिरावर पडतील, अशा पद्धतीने ते बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींवर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या भिंतींवर नक्षीकामाच्या सहाय्याने पौराणिक कथांचे चित्रण केले आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली असून येथे पूजा करण्यास मनाई आहे.
सूर्यमंदिर परिसर तीन प्रमुख घटकांमध्ये विभागलेला आहे. गुडमंडप (तीर्थस्थान), सभामंडप (असेंब्ली हॉल) आणि कुंड (जलाशय). कुंडाच्या पायऱयांवर 108 छोटी मंदिरे बांधलेली आहेत. सूर्यमंदिर 52 उत्कृष्ट खांबांसाठी
प्रसिद्ध असून हे 52 खांब वर्षातील 52 आठवडे दर्शवतात. खांबांवर रामायण, महाभारत आणि कृष्णलीलांची दृश्ये आहेत.
सूर्यमंदिर हे सुवर्णयुगातील उत्कृष्ट कारागिरीचे अनुकरणीय ठिकाण आहे. मंदिराची वास्तू अतिशय गुंतागुंतीची आणि विस्तृत असून ती मारू-गुजरा चालुक्मय स्थापत्यकलेची शैली प्रतिबिंबित करते. आता सूर्यमंदिर राष्ट्रीय महत्वाचे संरक्षित स्मारक बनल्यामुळे सध्या मंदिरातील सर्व भक्तीकार्ये बंद करण्यात आली आहेत.
मोधेश्वरी माता मंदिर
गावात मोधेश्वरी माता मंदिरदेखील आहे, जे देवी मोधेश्वरी मातेला समर्पित आहे. येथील देवी पार्वतीचा अवतार समजली जाते. ती मोझ समाजाची कुलदेवी आहे. एक राक्षस या परिसरात सर्व काही नष्ट करत होता. त्यामुळे घाबरलेले संत देवी पार्वतींकडे गेले. त्या अन्यायाबद्दल ऐकून क्रोधित झाल्या आणि तिच्या अवतार देवी मोधेश्वरीला जन्म देऊन तिच्या तोंडातून अग्निचा वर्षाव सुरू झाला, अशी या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते. मंदिरातील देवीच्या मूर्तीला 18 हात असून प्रत्येक हातात शस्त्र आहे.
– संकलन – जयनारायण गवस