गांधीनगरमध्ये राष्ट्रीय महापौर संमेलन ः
वृत्तसंस्था/ गांधीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित दोन दिवसीय ‘राष्ट्रीय महापौर संमेलना’त भाग घेतला आहे. पंतप्रधान या कार्यक्राम व्हर्च्युअली सहभागी झाले. या संमेलनात देशभरातील भाजपचे महापौर अन् उपमहापौर सामील झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात पुढील 25 वर्षांसाठी शहरी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात या संमेलनाची मोठी भूमिका असल्याचे मोदी म्हणाले.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हा विचार भाजपने अवलंबिला आहे. हेच मॉडेल आम्हाला इतरांपासून वेगळे ठरविते. सामान्य नागरिकाचा संबंध सरकार नावाच्या कुठल्याही व्यवस्थेशी येत असल्यास तो ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिकेशी येतो. याचमुळे अशाप्रकारच्या विचारविनिमयाचे महत्त्व वाढते. शहरांच्या विकासाबद्दल दाखविलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी भाजपवर असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
देशभरातील 121 महापौर आणि उपमहापौर या संमेलनात सामील झाले आहेत. हे महापौर संमेलन पक्षाच्या सुशासन शाखेकडून आयोजित करण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शहरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या संमेलनात भाग घेला आहे.
शहरी विकासासाठीचा स्वतःचा दृष्टीकोन मांडण्यासह देशभरातील महापौरांना शहर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या विविध शासकीय योजनांबद्दल फडणवीस माहिती देणार आहेत. 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महापौर, उपमहापौर, अन्य प्रतिनिधी या संमेलनात स्वतःचे विचार मांडणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापनासह शहरांमध्ये उद्भवणाऱया समस्यांवर या संमेलनात चर्चा होणार आहे.