ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्तानं भाजपकडून ‘सेवा आणि समर्पण मोहीम’ राबवण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त मोदींवर देशातूनच नाही तर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासहीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निरोगी राहून दीर्घायुष्य प्राप्त करत आपल्या ‘अहर्निश सेवामाहे’ भावनेनं राष्ट्रसेवेचं कार्य करत राहण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा, असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींना शुभेच्छा देताना ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याची कामना केल्या. तर, मोदींच्या रुपात देशाला सशक्त आणि निर्णायक नेतृत्व मिळालंय. काही दशकांपासून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या कोट्यवधी गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडून केवळ त्यांना समाजात सन्माननीय स्थान दिलं नाही तर एका प्रजावत्सल नेतृत्वाचं उदाहरणच त्यांनी जगासमोर मांडलं’ अशा शब्दांत मोदींचं कौतुक केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदींच्या निरोगी आयुष्य आणि भरभराटीची कामना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदीजी’ असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.