वृत्तसंस्था/ ऍडलेड
ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाण संघाला एकही सामना जिंकता आला नाही. संघाच्या या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून कर्णधार मोहम्मद नबीने शुक्रवारी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा स्वखुशीने दिला आहे.
या स्पर्धेत अफगाण संघाची कामगिरी निराशजनक झाली. या संपूर्ण स्पर्धेत अफगाणला एकही सामना जिंकता आला नाही. अफगाण संघाला शुक्रवारच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून केवळ 4 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अफगाण संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी या स्पर्धेत तीन सामने गमविले तर पावसामुळे त्यांचे दोन सामने वाया गेले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात अफगाणचा संघ गट-1 मध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. गेल्या वषी अफगाणच्या क्रिकेट मंडळाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी मोहम्मद नबीकडे कर्णधारपद सोपविले होते. तत्पूर्वी रशिद खानकडे अफगाणचे नेतृत्व होते. 2006 साली पहिल्यांदा नबीकडे अफगाणचे नेतृत्व देण्यात आले होते. नबीच्या नेतृत्वाखाली अफगाणने 10 सामने जिंकले असून 13 सामने गमावले आहेत. अफगाणचा तो महत्त्वाचा क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याने तीन कसोटी, 133 वनडे आणि 104 टी-20 सामन्यात फलंदाजीत 4 हजार 362 धावा तर गोलंदाजीत 234 गडी बाद केले आहेत.