झेन स्पोर्ट्सचा दहा गड्यांनी पराभव, करण मोरेने पटकावली दुचाकी : 20 हजारहून अधिक प्रेक्षकांनी लुटला सामन्याचा आनंद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात मोहन मोरे संघाने झेन स्पोर्ट्स मुंबई संघाचा दुसऱ्या डावात दहा गड्यांनी पराभव करून अनिल बेनके चषकासह 5 लाखाचे रोख बक्षीस पटकाविले. मोहन मोरे संघाचा करण मोरे मालिकावीरासह रॉयल इनफिल्ड हंटर दुचाकी वाहनाचा मानकरी ठरला. उपविजेता झेन स्पोर्ट्स संघाने अडीच लाखाचे बक्षीस मिळविले. अंतिम सामन्यात बेळगावातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार्स मैदानावर 20 हजारहून अधिक प्रेक्षकांनी अंतिम सामन्याचा आनंद लुटला.
सरदार्स मैदानावर आयोजित करण्यात आलेल्य पाचव्या अनिल बेनके चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांच्या हस्ते दोन्ही संघांची ओळख व नाणेफेक करून करण्यात आली. मोहन मोरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या डावात झेन स्पोर्ट्स संघाने 12 षटकात 6 बाद 133 धावा जमवल्या. प्रथमेश पवारने 5 षटकार, एक चौकारासह 20 चेंडूत 43, मुन्ना शेखने 2 षटकारासह 32 तर उस्मान पटेलने 1 षटकार, 2 चौकारासह 19 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रज्योत अंबिरे व गणेश देटेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. पहिल्या डावात प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 12 षटकात 4 बाद 171 धावा करून पहिल्या डावात झेन संघावर 38 धावांची आघाडी मिळवली. फरदीन काझीने 3 षटकार, 7 चौकारासह 18 चेंडूत 50, करण मोरेने 1 षटकार, 8 चौकारासह 23 चेंडूत 50 तर मंगेश वैटेने 1 षटकार, 3 चौकारासह 17 चेंडूत 32 धावा केल्या. झेन स्पोर्ट्स संघातर्फे बिलाल व राकेश प्रभू यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
झेन स्पोर्ट्स संघाने दुसऱ्या डावात 38 धावांचे ओझे घेऊन खेळताना 12 षटकात 9 बाद 110 धावा केल्या. कृष्णा पवारने 2 षटकार, 4 चौकारासह 13 चेंडूत 35, आकाश पोलार्डने 2 षटकारासह 23 तर उमर खानने 3 चौकारांसह 23 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रज्योत अंबिरेने 23 धावात 3, ओजे बाबाने 2 गडी बाद केले. मोहन मोरे संघाने 73 धावांचे आव्हान 6.2 षटकात बिनबाद 76 धावा करून पार करीत 10 गड्यांनी विजय मिळविला. फरदीन काझीने 2 षटकार, 6 चौकारासह 17 चेंडूत 44 तर करण मोरेने 4 चौकारासह 28 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, रामचंद्र मन्नोळकर, नागेश आंबोलकर, जयप्रकाश, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, पुरस्कर्ते आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते विजेत्या मोहन मोरे संघाला आकर्षक चषक, 5 लाख 1 रुपये रोख, तर उपविजेत्या झेन स्पोर्ट्सला 2 लाख 50 हजार 1 रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर फरदीन काझी (मोहन मोरे), उत्कृष्ट फलंदाज मुन्ना शेख (झेन स्पोर्टस्), उत्कृष्ट गोलंदाज प्रज्योत अंबिरे (मोहन मोरे), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रसाद शिरवलकर (श्री स्पोर्टस् खडक गल्ली) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर पुरस्कार तडाखेबाज फलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेल्या मोहन मोरे संघाच्या करण मोरेला रॉयल इनफिल्ड हंटर ही दुचाकी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून सुनील पाटील कोल्हापूर, सचिन सांगलेकर मुंबई, अनंत माळवी बेळगाव, तर स्कोरर म्हणून सुजीत शिंदोळकर, गणेश मुतगेकर, विठ्ठल दुरगाई व वहाब गोरेखान यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, मोहन वाळवेकर, युवराज पाटील, आरिब बाळेकुंद्री व मुंबईचे चंद्रकांत शेटे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल बेनके यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रवीण शिंदे व संतोष शिंदे यांनी या मैदानाची खेळपट्टी बनविली तर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स ऑन या चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात आले होते.