इंजिनियर्सनी कमाल केल्याचे उद्गार
मोहनलाल केवळ अभिनेता नसून भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या पदाने त्यांना गौरविण्यात आले आहे. 2018 मध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मीत त्यांचा लेफ्टनंट कर्नल म्हणून समावेश करण्यात आला होता. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतवर जाण्याची संधी त्यांना अलिकडेच मिळाली आहे. कोची शिपयार्डमध्ये तयार करण्यात आलेल्या विमानवाहू युद्धनौकेला पाहून मोहनलाल यांनी ‘इंजिनियरिंग चमत्कार’ असे संबोधिले आहे.
ही युद्धनौका सदैव विजयी ठरावी अशी प्रार्थना दृश्यम फेम अभिनेत्याने केली आहे. विमानवाहू युद्धनौकेवरील प्रवासाचा अनुभव मोहनलाल यांनी सोशल मीडियावर कथन केला आहे. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतवर जाण्याची संधी मिळाल्याने सन्मानित झाल्याची अनुभूती होत आहे. लवकरच केरळमध्ये निर्मित विक्रांतला नौदलात सामील केले जाईल. 13 वर्षांच्या समर्पित निर्मितीनंतर हा इंजिनियरिंगचा चमत्कार भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणार असल्याचे मोहनलाल यांनी नमूद केले आहे.
या अविश्वसनीय संधीसाठी विशेषकरून कमांडिंग ऑफिसर, कमोडोर विद्याधर हरके, व्हीएसएम अणि कोची शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक मधु नायर यांचे आभार मानतो. या युद्धनौकेची बेजोड वैशिष्टय़े पाहून याच्या निर्मितीत सहभागी सर्व लोकांना सलाम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोहनलाल यांनी पहिल्यांदाच ‘बॅरोज ः गार्डियन ऑफ डी गामाज ट्रेजर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिग्दर्शनाच्या जबाबदारीत ते सध्या व्यस्त आहेत. याचबरोबर ते शाजी कैलास यांचा चित्रपट ‘अलोन’मध्ये दिसून येतील.