पुणे / प्रतिनिधी :
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत चुहा गँग टोळीप्रमुखासह त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत करण्यात आलेली ही 93 वी मोक्का कारवाई आहे.
ईस्माईल मौलाली मकानदार (वय 26, चुहा गँग टोळीप्रमुख) जावेद मेहबुब मुल्ला (27) तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चुहा जमीर सैय्यद (28, सर्व रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अधिक वाचा : मुंबईत भाजपा-आरपीआयला मनसेची गरज नाही
सराईत ईस्माईल मकानदारने प्रत्येक गुन्ह्याच्यावेळी दोन साथीदार घेऊन परिसरात दहशत माजविली होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दहशत माजविण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. याप्ररकणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यावतीने चुहा गँगविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली.