पुणे / वार्ताहर :
Mokka action against the extortionist Khan gang पुण्यातील चंदननगर परिसरात दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणाऱ्या सराईत आसिफ खान याच्यासह टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या टोळीविरूद्ध दरोडा, खंडणी, लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 114 वी कारवाई आहे.
आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान (वय 23, टोळी प्रमुख), इरफान हसन भोला (25 रा. जनता वसाहत पर्वती, मुळगाव – कर्नाटक), शहाबाज मेहमुद खान (50), समीर मेहबुब शेख (36), फरियाज हसनखान पठाण (32 तिघेही रा. संतोषनगर, कात्रज) आणि जॉन अशी मोक्कानुसार गुन्हा केलेल्यांची नावे आहेत.
आरोपी आसिफ खान हा टोळी प्रमुख असून त्याने इतर सहा साथीदारांना सोबत घेऊन चंदननगर पोलीस स्टेशन तसेच करमाड, औरंगाबाद ग्रामीण या पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा, खंडणी यासारखी गैरकृत्ये सुरू ठेवली होती. त्यांच्यावर वेळोवेळी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी गंभीर गुन्हे केलेले आहेत. या आरोपींविरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि कलम 386, 384, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर आला फोन
सराईत आसिफ खान कोंढव्यातील राहणारा असून, त्याने साथीदारांसह चंदननगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. खराडीतील आय.टी. पार्कमधील कंपनीच्या मालकास धमकावून खंडणी उकळली. बेकायदेशीर कृत्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे, औरंगाबाद ग्रामीण हद्दीत गुन्हे दाखल आहेत. टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यावतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली.