वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ पुरुषांच्या निवड समिती सदस्यांसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू नयन मोंगिया, मनिंदर सिंग, अजय रात्रा आणि शिवसुंदर दास हे इच्छूक असून त्यांनी या जागांसाठी आपले अर्ज बीसीसीआयकडे दाखल केले आहेत.
पुरुषांच्या क्रिकेट निवड समिती सदस्यांसाठी इच्छूक उमेदवाराला सोमवार 28 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट घालण्यात आली होती. आता निवड सदस्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या क्रिकेट सल्लागार समिती समोर मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतीनंतरच नव्या निवड सदस्यांची स्थापना केली जाईल. 2023 मध्ये भारतात होणाऱया यजमान भारत आणि लंका यांच्यातील वनडे मालिकेसाठी संघ निवडीची जबाबदारी या नव्या निवड समितीवर राहिल. आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने पूर्वीची निवड समिती तातडीने बरखास्त केली होती. तत्कालिन निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. मात्र, चेतन शर्मा यांची निवड समिती प्रमुख पदावरून उचलबांगली केली असली तरी ते बीसीसीआयच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चेतन शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक तसेच कूच बिहार करंडक स्पर्धा बाद फेरीपर्यंत पोहोचल्या आहेत. शिवसुंदर दास हा पंजाब संघाचा फलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तत्पुर्वी त्यानी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रमुख प्रशिक्षकासमवेत कार्य केले होते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज देबासिस मोहांती यांचा निवड सदस्य म्हणून पाच वर्षांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे मोहांतीच्या जागी कदाचित एस. एस. दासची निवड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बीसीसीआयच्या अस्तित्वात असलेल्या निवड समितीमधील तीन सदस्यांना पुन्हा या जॉबसाठी अर्ज पाठविण्यास संमती राहिल. मात्र, कर्नाटकाचा माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशीने हे पद सोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या निवड समितीमध्ये पश्चिम विभागाकडून जागा रिकामी राहिल. भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज नयन मोंगियाने यापूर्वी बडोदा निवड समितीमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवर कार्य केले आहे. निवड सदस्यासाठी तो एक आता सर्वात अनुभवी उमेदवार राहिल. त्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 44 कसोटी आणि 140 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मुंबईचे समीर दीघे, सलील अंकोला, उत्तरप्रदेशचा ग्यानेंद्र पांडे, पंजाबचा रितिंदर सोधी हे निवड समिती सदस्यासाठी इच्छूक असल्याचे समजते. मात्र, अजित अगरकरने या जागेसाठी आपला अर्ज पाठविलेला नाही.