युएईमधून भारतात आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. हा रुग्ण तीन दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीमधून (युएई) केरळमधील कोल्लम येथे पोहोचला होता. सदर रुग्णाला खूप ताप येण्याबरोबरच शरिरावर फोड येणयाची लक्षणे दिसून आली होती. संभाव्य लक्षणांमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे गुरुवारी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. दरम्यान, देशात मंकीपॉक्सचा फैलाव वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारने राज्यांना पत्राच्या माध्यमातून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत
सदर व्यक्ती परदेशात मंकीपॉक्सच्या रुग्णाच्या संपर्कात आली होती. आता या नव्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 प्रवाशांची देखील तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी कोलकाता, पश्चिम बंगालमध्येही मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला होता. मात्र त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला होता. आता मंकीपॉक्सच्या देशातील पहिल्या रुग्णाची नोंद केरळमध्ये झाली आहे. 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्णही केरळमध्येच सापडला होता.
मंकीपॉक्सच्या धोक्मयाबाबत केंद्राकडून राज्यांना सूचना
जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकारने सतर्कता वाढवली आहे. गुरुवारीच केंद्र सरकारने राज्यांना मंकीपॉक्सबाबत इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या 6,000 पेक्षा जास्त झाली आहे. त्याचवेळी, आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे युरोप आणि आफ्रिकेत आढळून आली आहेत.