देशात चौथ्या रुग्णाची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोना व्हायरसनंतर आता मंकीपॉक्सचा धोका वाढू लागला आहे. केरळपाठोपाठ आता राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा नवा रुग्ण आढळून आला आहे. केरळमध्ये आतापर्यंत तीन रुग्ण सापडले होते. आता दिल्लीत रुग्ण सापडल्याने देशातील मंकीपॉक्सग्रस्तांचा आकडा चारवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिल्लीत मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाने कोठेही विदेश प्रवास केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचे वय अंदाजे 31 वर्षे असून त्याच्यावर सध्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मंकीपॉक्समुळे डब्ल्यूएचओने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. तसेच आता भारतानेही सावधगिरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. देशात रुग्ण वाढू लागल्यानंतर सरकारने मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी 16 प्रयोगशाळा मंजूर केल्या आहेत. या 16 पैकी 2 प्रयोगशाळा केरळमध्ये आहेत. आतापर्यंत भारतासह 80 देशांमध्ये 16,886 रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापैकी युरोपमध्ये सर्वाधिक 11,985 लोक मंकीपॉक्सने बाधित झाले आहेत. या रोगाचा सर्वाधिक प्रभाव ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम या देशांमध्ये जाणवत आहे. मंकीपॉक्सने यावषी आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत प्रथमच दोन मुलांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. सध्या दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले.