ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोनानंतर आता जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसला तरीही इतर देशांमधील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभाग मंकीपॉक्सबाबत सतर्क होताना दिसत आहे.
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. अमेरिका-ब्रिटनसह जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने शुक्रवारपासून सर्व आंतरराष्ट्रीय एन्ट्री पॉईंट्स, विमानतळ, बंदरे आणि बॉर्डर क्रॉसिंगवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. तसेच आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या आणि मंकीपॉक्सची लक्षणे दाखवणाऱ्या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्राच्या सुचनेनुसार महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. -मागील 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱया सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. -या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱयांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
-रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट टेसिंग सुरू केले जाईल.
-रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
-गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.
-जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱया होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.
‘ही’ आहेत मंकीपॉक्सची लक्षणं
ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जी सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. संक्रमित रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ येतात. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. प्राण्यांमार्फतही हा विषाणू पसरतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.