कसबे डिग्रज/प्रतिनिधी
मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज ग्रामपंचायत मध्ये ठेकेदारांची मक्तेदारी दिसून येत आहे. ठेकेदार विनाकारण ग्रामपंचायत मध्ये दिवसभर ठाण मांडून गप्पागोष्टी करीत बसल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडील शिक्के ठेकेदार बिनदिक्कत खिशात घेऊन फिरत असल्याने शिक्क्यांअभावी सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सर्वसामान्यांना एक कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात मात्र ठेकेदारांची कामे चुटकीसरशी होतात यामागील गौडबंगाल काय असा प्रश्न आहे. अशातच आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी ग्रामसभेची दिशाभूल करून ग्रामरोजगार सेवक पदी चक्क एका ठेकेदाराची नियुक्ती केल्याने वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. ग्रामपंचायतीत ठेकेदारांचा वाढता वावर बघून सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी ग्रामपंचायत पदाधिकारी मात्र गप्प असल्याने पदाधिकाऱ्यांचाच अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची शंका व्यक्त होतेय. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ग्रामसभेत ठेकेदारांना अदा केलेल्या बिलांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाचा विषय समोर असताना ठेकेदारांचा इतका लाड कशासाठी असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे.