Tarun Bharat

मोप विमानतळ, इस्पितळाचे मोदींच्याहस्ते 11 रोजी लोकार्पण

जागतिक आयुर्वेद परिषदेचाही करणार समारोप

प्रतिनिधी/ पणजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट निश्चित झाली असून दि. 11 रोजी त्यांच्याहस्ते मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोप येथील आयुर्वेदिक इस्पितळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पणजीत होणाऱया 4 दिवसांच्या जागतिक आयुर्वेद परिषदेचा समारोप करणार आहेत.

या उद्घाटनासाठी येणारे पंतप्रधान मोदी थेट मोप विमानतळावरच उतरणार आहेत. तेथून हॅलिकॉप्टरद्वारे ते पणजीत कांपाल येथे येतील. 1200 कोटी रुपये खर्च करून देशात तीन ठिकाणी बांधण्यात आलेल्या आयुर्वेदिक इस्पितळ प्रकल्पांचे पणजीतून लोकार्पण करतील. त्यात गोव्यातील इस्पितळाचाही समावेश असेल. त्यानंतर जागतिक आयुर्वेद परिषदेत समारोप सोहळ्यात संबोधित करतील. दि. 8 ते 11 डिसेंबर दरम्यान होणाऱया या परिषदेत 36 देशांचे सुमारे 3000 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दि. 8 रोजी केंद्रीय आयुषमंत्री सर्वानंद सोनवाल, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानिमित्त कांपाल मैदानावर सुमारे 450 स्टॉल्स स्थापन करण्यात येणार असून विविध औषधांच्या माहितीसह आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.

परिषदेच्या समारोपानंतर सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान पुन्हा मोप येथे जाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकापर्ण करतील. त्यानंतर पंतप्रधान दिल्लीसाठी प्रयाण करतील.

यंदा फेस्तची फेरी नाही

दरम्यान, दि. 8 रोजी पणजीत होणाऱया मेरी इमॅक्युलेट सायबीणीच्या फेस्तनिमित्त कांपाल चौपाटीवर आयोजित करण्यात येणारी फेरी यंदा भरणार नाही. त्याच दिवसापासून प्रारंभ होणारी जागतिक आयुर्वेद परिषद तसेच पंतप्रधानांची भेट या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव या फेरीला मान्यता देण्यात आलेली नाही. यापूर्वी या फेरीसाठी मान्यता मिळविण्यासाठी मनपाकडून अर्जही करण्यात आला होता. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरक्षेच्या कारणास्तव तो नाकारला.

Related Stories

पेडणे तालुक्यातील धोकादायक रस्ते त्वरित दुरुस्त करा

Amit Kulkarni

भाजपच्या पराभवासाठी संपूर्ण क्रांतीची गरज : सरदेसाई

Amit Kulkarni

अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल

Amit Kulkarni

क्रांतिवीर दीपाजी राणेंना यापुढे सरकारची मानवंदना

Amit Kulkarni

आगामी काळातही भाजपचे सरकार

Amit Kulkarni

राज्यात जोरदार पाऊस

Patil_p