Tarun Bharat

मोप विमानतळ म्हणजे ‘फिल गोवा’!

विमानतळावर उतरल्याबरोबर येणार गोव्याचा सुखद अनुभव : जिथे पहाल तिथे गोव्याची कला, संस्कृती व परंपरेचा छाप

सागर जावडेकर /पणजी

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाची रंगरंगोटी आणि ‘फेसलिफ्ट’ चढविण्याच्या कामी 12 हजार हात गुंतलेले आहेत. उद्घाटन समारंभाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. मोपवरून ‘फिल गोवा’ आणि ‘गोवा अनुभवा’ असा जणू सल्लाच दिला जाणार आहे. संपूर्ण विमानतळ टर्मिनसवर गोव्याची कला, संस्कृती व परंपरेचा छाप उमटवला जात आहे. प्रख्यात व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांची चित्रे, पारंपरिक पद्धतीच्या घरांची तावदाने, कमानी आणि एका भिंतीवर लावण्यात आलेले गोंयचे ‘पाव’! हे सारे पाहिल्यानंतर विमानतळावर उतरल्याबरोबर ‘फिल गोवा’चा सुखद अनभव मिळणार आहे.

विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यांना घेऊन येणारे विमान या विमानतळावर उतरले जाणार आहे आणि या विमानतळावरून पहिले उड्डाण करणारे विमानदेखील पंतप्रधानांचेच असेल.

विमानतळ ठरणार गोमंतकीय परंपरेचे प्रतिबिंब

उद्घाटनासाठी मोप विमानतळ सज्ज होत आहे. गोमंतकाच्या परंपरेला साजेशी कलाकृती हे या मोप विमानतळाचे खास वैशिष्टय़ ठरणार आहे. देशातील एक उत्कृष्ट व सुंदर विमानतळ प्रकल्प असा हा प्रकल्प नावलौकिकास येण्याची चिन्हे आहेत. विमानतळावर खर्च करताना हात कुठेही आखडलेले दिसत नाहीत. मोप विमानतळाच्या धावपट्टीनंतर सर्वांत मुख्य भाग जो प्रवाशांशी निगडीत असतो तो म्हणजे पॅसेंजर टर्मिनस! या प्रकल्पावरून विमानतळाचा दर्जा ठरत असतो. संपूर्ण टर्मिनसवर गोव्याच्या कला, परंपरा आणि संस्कृतीचा साज चढलेला आहे. त्यामुळे टर्मिनसमध्ये प्रवेश करताच तुमचे स्वागत एका भिंतीवरील ‘पावांच्या’ रांगेने होत असते. तिथून पुढे गेल्यानंतर मारियो मिरांडांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या चित्रांच्या प्रतिकृती भिंतीवर दिसतात.

हिंदी, इंग्रजीबरोबर कोकणीचा वापर

विमानतळावर जिथे जिथे फलक आहेत त्यावर हिंदी, इंग्रजीबरोबरच कोकणी भाषेतील शब्द दिसतात. सारी यंत्रणा स्वयंचलित आहे. हे विमानतळ अशा पद्धतीचे असेल जिथे फार गोंगाट असणार नाही. वारंवार सूचना वा घोषणा केल्या जाणार नाहीत. सारे काही ई-बोर्डवर आपल्याला पहायला मिळेल. येथे दुकाने सज्ज झालेली आहेत. योग्य रंगसफेदीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. प्रत्येक दुकान हे गोमंतकीय पारंपरिक घरांच्या पद्धतीचे वाटावे तसा आभास निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न आहे.

तुमचा चेहरा हाच तुमचा सेक्युरिटी पास

गोवा सरकारचा आग्रह होता ‘फिल गोवा’ म्हणजेच गोवा अनुभवा किंवा ‘गोवा भावला’ असे म्हणता येईल. हिच थीम या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातून राबविली जात आहे. सुमारे 67 हजार चौरस मीटर क्षेत्रात विमानतळ प्रकल्पाचा प्रवासी टर्मिनस उभारला आहे. एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. शिवाय विमानातून उतरल्यानंतर बाहेर पडण्यासाठी वेगळा विभाग असून अतिमहनीय व्यक्तींसाठी पश्चिम दिशेने प्रवेशद्वार! बंगळूर येथील विमानतळावर प्रवेश केल्यानंतर जसा फिल येतो तशाच पद्धतीने या टर्मिनसमध्ये प्रवेश केल्यानंतर वाटेल. आत प्रवेश केल्यानंतर आतील भागात अनेक काऊंटर उभारलेले आहेत. तिथून आत वळल्यावर सेक्युरिटिजकडे जाण्याचे मार्ग आहेत. आत तुमचा चेहरा हाच तुमचा सेक्युरिटी पास ठरणार आहे. तशा पद्धतीची यंत्रणा मोप विमानतळ प्रकल्पावर उभारलेली आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा विमानतळाला गराडा

येत्या रविवारी 11 डिसेंबर रोजी सायं. 4.30 वा. पंतप्रधान या प्रकल्पाचे उद्घाटन करतील. तिथेच ते जनतेला उद्देशून मार्गदर्शन करतील. त्यासाठी भव्य हँगर उभारण्यात आलेला आहे. हँगर उभारण्याचे काम हरियाणा वा दिल्लीबाजूच्या कंत्राटदारांनी केलेले आहे. हा हँगर केवढा मजबूत आहे, त्यावर उभारण्यात आलेली स्टेज व इतर आसपासची सुरक्षा व्यवस्था याचा अंदाज व अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीतून खास वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आज गोव्यात पोहोचत आहेत. विमानतळावर बुलेटप्रुफ कार पोहोचलेली आहे. सुरक्षाधिकारी, कर्मचाऱयांनी विमानतळ व आसपासच्या परिसरात कुमक तैनात करून जणू काही गराडाच घातलेला आहे.

पंतप्रधानांच्या सभेसाठी सात हजार उपस्थिती

उद्घाटन जरी रविवारी होणार असले तरी प्रत्यक्षात विमानसेवा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होईल. आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण हे जानेवारीच्या अखेरीस सुरु होईल. पंतप्रधानांसाठी उभारण्यात येणाऱया मोठय़ा हँगरमध्ये सहा ते सात हजार नागरिक सामावतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय त्याच्या समोरच्या जागेत आणखी तीन छोटे हँगर्स उभारण्यात आलेले आहेत. यात अधिकतर सुरक्षा व्यवस्था तसेच एका हँगरमध्ये चहापाणी नाष्टा, महनीय नेत्यांची बसण्याची व्यवस्था होईल.

सर्व कामे पूर्ण करण्यासाठी जीएमआर कार्यरत

सध्या विमानतळावरील रस्ते गुळगुळीत करण्याचे काम सुरू आहे. दीड-दोन महिन्यांपूर्वी ठिकठिकाणी मातीचे ढिगारे दिसत होते. आता त्या जागी हिरवळ तसेच अनेक आकर्षक झाडे, शोभेचे माडसदृश झाडे उभारलेली दृष्टीस पडतात. जीएमआरच्या प्रशासकीय इमारतीत अधिकारी व कर्मचाऱयांची धावपळ सुरू झालेली आहे. दिवसरात्र हे अधिकारी काम करतात. शिवाय विविध कंत्राटदारांनी लावलेल्या कामगारांकडून विमानतळ परिसरातील रस्त्याच्या बाजूंची रंगरंगोटी, सिमेंटच्या लाद्या बसविणे, खांब उभे करणे, शोभेचे फलक लावणे, दिशादर्शक फलक उभारणे, शोभेची झाडे लावणे इत्यादी कामे चालूच आहेत. उद्घाटन समारंभापर्यंत ही रंगरंगोटी केली जाईल. टर्मिनस व त्यासमोर उभारण्यात येणाऱया शेड्सचे काम रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश आहे. मात्र सुरक्षा व्यवस्थेने पुढील तीन दिवसांत कामे पूर्ण करा असे सांगितलेले. टर्मिनसची रंगरंगोटी तसेच आतमध्ये आसन व्यवस्थेचे काम तातडीने हाती घेतले असले तरी सर्वच काम पूर्ण होणार नाहीत. प्रत्यक्षात विमान उतरण्याचे काम जानेवारीमध्येच सुरू होईल. जेवढय़ा भागात शक्य होईल तेवढय़ा भागाचे काम पूर्ण करून आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यापूर्वी सारी कामे पूर्ण करण्याचा इरादा जीएमआरचा आहे.

पेडणे तालुक्याचा होणार कायापालट

पेडणे तालुका! एकेकाळी पूर्णपणे दुर्लक्षित झालेला. ज्या गावात गाडी जात नव्हती, त्या मोप गावात आज विमाने उतरतील. हे गाव आंतरराष्ट्रीय नकाशावरदेखील पोहोचले. मोप विमानतळ प्रकल्पाने पेडणेचा कायापालट होईल. पेडणे तालुक्याला अनन्यसाधारण महत्त्व येईल. मोप विमानतळावर जाण्यासाठी सध्याचा रस्ता गुळगुळीत बनवलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा अपघात नियंत्रण कुंपण उभारलेले आहे. रस्ता तसा अरुंद आहे. या विमानतळामुळे पणजी-म्हापसा, पणजी-पेडणे भरगच्च असंख्य वाहनांनी भरून जाईल. वारंवार ट्राफिक जॅम होण्याची शक्यता जास्त आहे.

विमानतळावर फिरताना गोव्याचा, कोकणीचा फिल येणार

मोप ते धारगळ दरम्यान पर्यायी हायवेचे कामही युद्धपातळीवर चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर धारगळ येथील वाहतुकीची कोंडी होणार नाही. एकेकाळी जंगल असलेल्या भागाचा पूर्णपणे कायापालट झाला. अनेकांचे भाग्य आता या प्रकल्पामुळे  फळफळणार आहे. जीएमआर कंपनीने जास्तीत जास्त पेडणेतील युवकांना घेऊन या पठारावर कामे दिलेली दिसतात. छोटी छोटी कामे ही त्या भागातील मर्यादित शिक्षण घेतलेल्या युवक युवतींना मिळत आहेत. विमानतळावर अनेक महत्त्वाच्या कामावर गोमंतकीयच माणसे आहेत. अनेकांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे मोप विमानतळावर उतरल्यानंतर जसा गोव्याचा फिल येईल तसा तो टर्मिनस व आसपासच्या परिसरात फिरतानादेखील कोकणी भाषेचा वापर करणारी माणसे दिसतील. आजवर दाबोळी विमानतळावर हा फिल कधी आलाच नव्हता तो फिल मोपवर निश्चित जाणवणार आहे.

मोप प्रकल्पाचे काम संपता संपणारे नाही. परंतु हजारो हात गेले दोन महिने राबत आहेत. आताही राबताहेत. गोव्याचा स्वतःच्या मालकीचा असा हा विमानतळ प्रकल्प असे म्हणता येईल. दाबोळी विमानतळ प्रकल्पावर आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अलिकडेच कुठेतरी गोमंतकीयांचा टच व्हावा यासाठी प्रयत्न केले. मात्र मोपवर सुरुवातीपासून ‘गोवन फिल’ येईल हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. गोमंतकीय चित्रकार, गोमंतीय वास्तुशिल्पकारांचीदेखील मदत इथे घेतलेली आहे.

प्रसाधनगृहांचेही वैशिष्टय़ !

या विमानतळावर प्रसाधनगृहे उभारतानादेखील इथे पुन्हा गोमंतकीय फिल व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. एका प्रसाधनगृहाला झाडे, हिरवळ म्हणजेच वनाचा फिल येतो. दुसऱया प्रसाधनगृहाला ‘समुद्र’ असे नाव दिलेले आहे. जिथे आत प्रवेश करताच लाटा, समुद्र, निळेशार पाणी वगैरे दाखविण्यात आलेले आहे. आत प्रवेश करताच त्याचा फिल येतो.

सर्व अत्याधुनिक यंत्रणेद्वारे हे विमानतळ उभारलेले आहे. अत्यंत मॉर्डन विमानतळ म्हणता येईल. परंतु जाईल तिथे ‘गोवा फिल’ होईल याची जबाबदारीच जीएमआर कंपनीने घेतलेली दिसतेय. एका पडिक जमिनीवर छोटी छोटी झाडे वाढलेली, डोंगर पठारावर जायला साधी वाटदेखील नव्हती त्याचा आज कायापालट झालेला दृष्टीस पडतो. कल्पनाशक्ती, इच्छा शक्ती प्रबळ असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. सर्वच पातळीवर अथक प्रयत्नांती मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प प्रत्यक्ष साकार झाला. मोप सज्ज आहे. तुमच्या स्वागताला. स्वर्गीय सुखाचा आनंद देण्यास!

Related Stories

सरकारी कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक हजेरी 15 मे पर्यंत स्थगित

Amit Kulkarni

माजी पुराभिलेख संचालकमामलेदार, उपनिबंधक एसआयटीच्या रडावर

Amit Kulkarni

भुईपाल येथे 29लाखाचे बनावट मद्य जप्त

Patil_p

हर्षाच्या मारेकऱयांना फासावर लटकवा

Amit Kulkarni

एकतरी हिंदू राष्ट्र असण्याची गरज

Amit Kulkarni

चोडण साऊद येथे उद्या सांज्याव

Amit Kulkarni