Tarun Bharat

‘मोप’ विमानतळाचे 11 डिसेंबरला राष्ट्रार्पण

विशेष प्रतिनिधी / पणजी

अखेर मोपा विमानतळ प्रकल्पाला मुहूर्त सापडला! पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या दि. 11 डिसेंबर रोजी गोव्यात येत असल्याचे निश्चित झाले असून त्या दिवशी सकाळी मोप विमानतळ प्रकल्पाचे ते राष्ट्रार्पण करतील. दुपारी विश्व आयुर्वेद परिषदेच्या संमेलनाचा पणजीत समारोप करणार आहेत. दरम्यान, मोप विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्या दि. 18 रोजी पर्वरी येथे मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 डिसेंबर रोजीची गोवा भेट निश्चित झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना तसे संकेत देण्यात आले असून येत्या दि. 22 नोव्हेंबर रोजी पोलीस यंत्रणा मोप विमानतळ परिसरात जाऊन तेथील पहाणी व अभ्यास करणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेची 22 रोजी बैठक

प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट मोप विमानतळ प्रकल्पावर विशेष विमानाने येतील. तिथे ते या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर त्यांचे उद्बोधनपर भाषण होईल. हा कार्यक्रम नेमका कोणत्या ठिकाणी करायचा याबाबत पोलीस यंत्रणा दि. 22 रोजी मोप विमानतळावर जाऊन तिथे आढावा घेऊन निश्चित करतील.

दिल्लीतील सुरक्षा अधिकारी येणार

पंतप्रधानांना कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने दिल्लीतील पोलीस अधिकारी लवकरच गोव्यात येणार आहेत. ते मोप विमानतळ प्रकल्पाच्या परिसराची पहाणी करतील. नंतर या प्रकल्पाभोवतालची सुरक्षा व्यवस्था निश्चित केली जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्या घेणार बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दि. 18 नोव्हेंबर रोजी पर्वरी येथील मंत्रालयात मोप विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटन संदर्भात व्यापक बैठक घेणार आहेत. कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा याबाबतही मुख्यमंत्री विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांना आदेश देतील.

भाजप गाभा समितीने घेतला आढावा

प्राप्त माहितीनुसार भाजपच्या गाभा समितीने बुधवारी सायंकाळी मोप विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

विमानतळापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती

मोप विमानतळ प्रकल्पाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 पासून मोप विमानतळ या दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम युद्धपातळीवर चालू आहे. हा रस्ता डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत सध्याचा जो मार्ग आहे त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गाच्या दुतर्फा विजेचे खांब उभारण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. तसेच या रस्त्याचे नव्याने हॉटमिक्सिंग केले आहे. हे कामही उद्या पूर्ण होणार आहे.

 मोपासाठी स्वतंत्र पोलीस स्थानक

दरम्यान मोप विमानतळ प्रकल्पामुळे आता गोवा सरकारने विशेष पोलीस स्थानक या परिसरात उभारण्याचे ठरविले आहे. सध्या धारगळ येथे पोलीस चौकी आहे. परंतु मोपा विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलीस स्थानक उभारले जाणार आहे.

सर्व जमीन मालकांना देणार उद्घाटनाचे निमंत्रण

गोवा सरकारने मोप विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला विमानतळ प्रकल्पाला ज्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत त्या सर्व जमीन मालकांना उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देणार आहे. उद्घाटन सोहळय़ाला 5 ते 7 हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Related Stories

वास्को बोगदा येथे रंगपंचमीला राजकीय वैमनस्याचे गालबोट

Omkar B

पूर्ण अधिकार अन् वाढीव निधीही देणार

Patil_p

वास्को मांगोरहिल मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची उंची वाढणार

Amit Kulkarni

सरकारने गोवा जणू विक्रीस काढला

Patil_p

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

Patil_p

वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई

Amit Kulkarni