पहिला टप्पा समाप्त, दुसरा 5 डिसेंबरला, मतगणना 8 डिसेंबरला होणार
गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्याचे मतदान पार पडले असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 59.24 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान दक्षिण गुजरात, सैराष्ट्र आणि कच्छ भागातील 19 जिल्हय़ांच्या 89 मतदारसंघांमध्ये पूर्ण झाले. मतदानाचा दुसरा टप्पा 5 डिसेंबरला होणार असून त्या टप्प्यात 93 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातमधील आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी शुक्रवारी समजणार आहे. मतगणना 8 डिसेंबरला होणार आहे.
विधानसभा निवडणुकीयच पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. या टप्प्यात 89 मतदारसंघांमध्ये एकंदर 39 राजकीय पक्षांचे आणि अपक्ष असे मिळून 788 उमेदवार होते. मतदारांची संख्या 2.23 कोटी होती. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजपने राज्यात 1995 पासूनच्या सलग सहा विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. आता या सातव्या निवडणुकीत काय होते, यासंबंधी उत्सुकता असून ती परिणाम समोर आल्यानंतरच संपणार आहे.
मतदान शांततेत
प्रथम टप्प्यातील मतदान प्रक्रिया जवळजवळ शांततेत पार पडली. साधारणतः 50 मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे नवी मतदान यंत्रे बसविण्यात आली. एक-दोन स्थानी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने काहीकाळ मतदानात व्यत्यय आल्याच्याही घटना घडल्या. पण त्वरित त्यांवर नियंत्रण मिळविण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.
सर्वाधिक मतदान तापीमध्ये
तापी जिल्हय़ात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक 72.32 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर नर्मदा जिल्हय़ात दुसऱया क्रमांकाचे सर्वाधिक 68.09 टक्के मतदान नोंद झाले. सर्वात कमी मतदान सौराष्ट्र भागातील भावनगर जिल्हय़ात झाले असून ते संध्याकाळी पाचपर्यंत 51.34 टक्के होते. नवसारी 65.91 टक्के, डांग 64.84 टक्के, वळसद 62.46 टक्के, गीर-सोमनाथ 60.46 टक्के अशी इतर काही जिल्हय़ांमधील मतदानाची प्राथमिक टक्केवारी आहे.
यंदाच्या निवडणुकीत रंगत
राज्यात यंदा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात त्रिकोणी लढत होत आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रुपाने तिसरा पक्ष रिंगणात उतरल्याने रंगत वाढली आहे. एकूण 182 जागांपैकी विधानसभेच्या 181 जागांवर आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे देवभूमी द्वारका जिह्यातील खंभलिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेले कुंवरजी बावलिया, मोरबीचे ‘नायक’ कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत. या महत्त्वाच्या उमेदवारांसह एकंदर 788 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.