अण्णासो मोरे यांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
पाचगाव प्रतिनिधी
मोरेवाडी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराच्या निषेधार्थ मोरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णासो मोरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करत मोरेवाडी ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
शहरालगत असणाऱ्या मोरेवाडी ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न सुमारे 60 ते 70 लाख रुपये आहे. या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आण्णासो मोरे यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोरेवाडी ग्रामपंचायतीने मूळ गावातील ग्रामपंचायत कार्यालयास लागूनच असणाऱ्या शाळेच्या इमारतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शाळेची इमारत ढासळत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावातील शाळाच बंद पडली आहे. या बंद शाळेसमोरच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी झेंडावंदन करण्यात येते. ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे गावातील शाळा बंद पडल्याचा आरोप आण्णासो मोरे यांनी केला आहे. तसेच तिरुपती पार्क ते म्हाडा कॉलनी रस्त्यावरील लाखो रुपये खर्च करून बांधलेले साकव ग्रामपंचायतीने फोडून सार्वजनिक मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.
मोरेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. या बांधकामांना ‘बोगस बांधकाम परवानगी’ देणारी टोळी ग्रामपंचायतीत कार्यरत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. मोरेवाडी परिसरात अनेक ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसमध्ये अंगणवाडीची इमारत बांधणे आवश्यक होते. मात्र अद्यापही एवढ्या मोठ्या गावातील अंगणवाडी भाड्याच्या खोलीत भरत आहे. ग्रामपंचायतीचे गावातील लहान मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ओपन स्पेसची मोरेवाडीतील काही स्वयंघोषित नेत्यांनी परस्पर विल्हेवाट लावली आहे, त्यांची चौकशी व्हावी. मोरेवाडी येथे पोलीस पाटील व कोतवाल यांची नेमणूक करावी, अशी मागणी करत मोरेवाडी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते आण्णासो मोरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी आण्णासो मोरे यांना पाठिंबा देण्यासाठी मोरेवाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरे यांच्या डिजिटल फलकांची गावात चर्चा
आण्णासो मोरे यांनी गावात ठीक ठिकाणी डिजिटल फलक उभारून ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची फोटो निशी पोलखोल करत ग्रामपंचायत बरखास्तीची मागणी केली आहे. या फलकांची गावात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे .