विश्वचषकातील चमकदार प्रदर्शनाचे फिफाकडून बक्षीस, येत्या फेब्रुवारीत होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ दोहा
मोरोक्को व गतउपविजेत्या क्रोएशिया यांच्यात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील तिसऱया क्रमांकाची लढत आज शनिवारी होणार असून रात्री 8.30 वाजता त्याची सुरुवात होईल. मोरोक्कोने या स्पर्धेत अनपेक्षितपणे चमकदार प्रदर्शन करीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून फिफाने त्यांच्या या कामगिरीचा बक्षीस म्हणून त्यांना पुढील वर्षीच्या क्लब वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. 2023 फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
शुक्रवारी फिफाने मोरोक्कोला या स्पर्धेचे यजमानपद दिल्याचे जाहीर केले. सात क्लब संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा 1 ते 11 फेब्रुवारी 2023 या दहा दिवसांच्या कालावधीत होईल. या स्पर्धेत सात क्लब संघ खेळणार असून त्यात युरोपियन चॅम्पियन रेयाल माद्रिद, दक्षिण अमेरिकन चॅम्पियन फ्लॅमेंगो व अमेरिकेचा कॉन्कॅकॅफ चॅम्पियन्स लीग विजेता सीटल साऊंडर्स यांचा या पारंपरिक सात संघांच्या फॉरमॅटमधील स्पर्धेत समावेश आहे. सात संघांचा सहभाग असलेली ही शेवटची स्पर्धा असून 2025 पासून ती विश्वचषक स्पर्धेप्रमाणे 32 संघांची केली जाणार असल्याचे फिफा अध्यक्ष जियानी इन्फन्टिनो यांनी सांगितले.
कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोने प्रेरणादायक घोडदौड करीत शेवटच्या चार फेरीपर्यंत मजल मारली. फिफा कौन्सिलने त्याची दखल घेत पुढील वर्षी होणारी क्लब वर्ल्ड कप स्पर्धा त्यांना बहाल करण्यात आली आहे, असे इन्फन्टिनो यांनी सांगितले. सात खंडीय चॅम्पियन्सच्या सहभागाची ही शेवटची स्पर्धा असून 2025 पासून ती 32 संघांची महिनाभर चालणारी स्पर्धा घेण्याची योजना आहे. त्यामुळे ही स्पर्धा विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोरोक्कोतील कॅसाब्लँका येथे यातील सामने खेळविले जाणार असून त्यांच्या दोन संघांचे ते बेस असेल. गेल्या मोसमात वायदादने आफ्रिका चॅम्पियन्स लीग आणि मोरोक्कन लीग स्पर्धा जिंकल्या तर राजा संघाने उपविजेतेपद मिळविले. त्यामुळे हे दोन संघ कॅसाब्लँकामध्ये वास्तव्य करतील. कॅसाब्लँकामध्ये 67000 क्षमतेचे स्टेड मोहम्मद व्हे स्टेडियम असून तेथेच या स्पर्धेतील आठपैकी काही सामने खेळविले जातील. मोरोक्कोने यापूर्वी 2013 व 2014 मध्ये क्लब वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली होती. 2005 मध्ये या स्पर्धेत पुनरुज्जीवन केल्यानंतर युरोपियन व दक्षिण अमेरिकन संघांनीच आजवर क्लब वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्या आहेत. आता नवीन फॉरमॅटमधील पहिली स्पर्धा 2025 पासून घेतली जाणार आहे. अमेरिकेत त्याचे आयोजन केले जाणार असून 2026 मधील विश्वचषकाची ती ‘टेस्ट इव्हेंट’ असेल, असे ते म्हणाले. 2026 ची विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा व मेक्सिको येथे संयुक्तपणे घेतली जाणार आहे.
क्लब वर्ल्ड कप स्पर्धा दरवेळी डिसेंबरमध्ये घेतली जाते. पण कतारमधील स्पर्धा अजून सुरू असल्याने ती पुढे ढकलण्यात आली असून फेब्रुवारीत ती घेतली जाणार आहे. 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत फिफाला 11 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळण्याची अपेक्षा असून त्यात 2025 मधील क्लब वर्ल्ड कपच्या महसुलाचा समावेश नसल्याचेही इन्फन्टिनो यांनी सांगितले.