Tarun Bharat

मोरोक्को पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचे आव्हान 0-3 फरकाने समाप्त

वृत्तसंस्था/ अल रय्यान, कतार

मोरोक्कोने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना येथे झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतील लढतीत माजी विजेत्या स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-0 असा पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले. गोलरक्षक यासिन बौनू हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने दोन पेनल्टी अडविल्या तर विजयी पेनल्टी अश्रफ हकिमीने नोंदवली.

निर्धारित वेळेत व जादा वेळेतही गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. स्पेनच्या पाब्लो साराबिया, कार्लोस सोलेर, सर्जिओ बुस्केट्स यांचे गोल हुकले. यापैकी पाब्लो साराबियाने मारलेला फटका गोलपोस्टच्या बारला लागला तर अन्य दोघांचे फटके मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बौनूने थोपविले. पेनल्टीमध्ये मोरोक्कोचा पहिला गोल अब्देलहमिद साबिरीने नोंदवला तर दुसरा गोल हकिम झियेचने केला. बद्र बेनोनने मारलेला तिसरा फटका बारला लागल्याने हुकला तर चौथ्या पेनल्टीवर अश्रफ हकिमीने गोलरक्षक युनाय सिमोनला भेदत निर्णायक गोल नोंदवल्यानंतर मोरोक्कोचा जल्लोष सुरू झाला आणि स्पेनच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले.

 निर्धारित वेळेत स्पेनने 75 टक्के बॉल पझेशन राखले होते. पण त्यांना मोरोक्कोचा भक्कम बचाव भेदता आला नाही. जादा वेळेतही गोलकोंडी कायम राहिली. मोरोक्को हा शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविणारा युरोप किंवा दक्षिण अमेरिका बाहेरील पहिला देश आहे. यापूर्वी 1986 मध्ये त्यांनी शेवटच्या सोळा संघांत स्थान मिळविण्याची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. वर्ल्ड कप स्पर्धेत पेनल्टी शूटआऊटमध्ये सर्वाधिक चार वेळा पराभूत होणारा स्पेन हा एकमेव संघ आहे. मोरोक्को व स्पेन हे शेजारी देश असून मोरोक्कोने साखळी फेरीतही कॅनडाला धक्का दिला होता तर स्पेनला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. स्पेनने 2010 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

Related Stories

माजी ऑलिम्पियन्सना प्रशिक्षणासाठी निमंत्रण

Patil_p

स्पेनच्या हॅलेपचे लक्ष दुसऱया जेतेपदावर

Patil_p

जोकोविचला नमवत नदाल उपांत्य फेरीत

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी

Patil_p

इंग्लंडच्या विजयात लॅम्ब, स्किव्हेरची चमक

Patil_p

बायर्नची सलग आठव्या जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p