पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागी दर्गा, मनसेचा दावा
ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वाराणसीतील ‘ज्ञानवापी’ मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम असे दोन गट आता समोरासमोर आले आहेत. हे प्रकरण न्यायालयात पोहचले असून, हिंदू मंदिराच्या जागेवर ही मशिद उभारण्यात आल्याचा दावाही हिंदू पक्षांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. दरम्यान, ज्ञानवापीचं हे लोण आता पुण्यातही पसरलं आहे. पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी दर्गे उभारण्यात आल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी केला आहे. तसेच या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असेही शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
रविवारी पुण्यात मनसेची सभा झाली. या सभेत बोलताना अजय शिंदे म्हणाले, अल्लाउद्दीन खिल्जीचा बडा अरब हा सरदार पुण्यावर चाल करून आला, त्यावेळी त्यानं भगवान शंकराची पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरं उद्धवस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या समोर आहे तर दुसरं लालमहालाच्या थोडं पुढे आहे. ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच पुण्यातल्या या मंदिरांच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत.
शिंदे यांनी याबाबत पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारला पत्रही लिहिलं आहे. तसेच या मंदिरांसाठी मनसे आगामी काळात लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. शिंदे यांच्या या भूमिकेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनीही पाठिंबा दिला आहे.