15 हजार कोटींवर पोहचणार उलाढाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूग्ध व्यवसायात उत्तरेत विशेषतः लोकप्रिय असणाऱया मदर डेअरीला त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात तिची उलाढाल 20 टक्क्यांनी वाढून सुमारे 15,000 कोटी रुपये होईल असा अंदाज सांगितला जात आहे. दिल्ली-एनसीआरच्या टॉप डेअरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलीश यांनी ही माहिती दिली आहे. खाद्यतेल आणि फळे आणि भाज्यांची विक्री करणाऱया मदर डेअरीची गेल्या आर्थिक वर्षात 12,500 कोटी रुपयांची उलाढाल होती.
मदर डेअरी प्रुट्स अँड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी ग्रेटर नोएडा येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या आयडीएफ वर्ल्ड डेअरी परिषदेच्या पार्श्वभूमीवर सांगितले, चालू आर्थिक वर्षात उलाढाल सुमारे 20 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असून हा टप्पा जवळपास 15,000 कोटींवर पोहोचणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात उत्पादन विक्री वाढणार आहे.
दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त मदर डेअरीचा खाद्यतेल, ताजी फळे आणि भाजीपाला आणि ब्रेडचा व्यवसायही चांगली कामगिरी करत आहे. कंपनी ‘धारा’ या ब्रँडखाली खाद्यतेल आणि ‘सफल’ या ब्रँडखाली ताजी फळे आणि भाज्यांची विक्री करते.