पुणे / वार्ताहर :
गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सासू-सुनेला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 13 हजारांचा 20 किलो गांजा जप्त करण्यात आला. लोणी काळभोर परिसरातील सोरतापवाडी चोरघे वस्तीनजीक ही कारवाई करण्यात आली.
अमली पदार्थ विरोधी पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सोरतापवाडी येथे दोन महिला डोक्यावर पिशवी घेऊन चालत होत्या. त्यावेळी पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी दोघींना थांबवून पिशव्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल 20 किलो 600 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडील गांजा जप्त करत दोघींना अटक केली. या महिला सासू-सुना आहेत. या महिला रेल्वेतून प्रवास करत गांजा तस्करीसाठी आल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?