वादानंतर प्रथमच पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कालीमातेसंबंधीच्या पोस्टर वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. कालीमाता हे संपूर्ण भारताचे भक्तीचे केंद्र आहे. कालीमातेचा आशीर्वाद देशावर असून अध्यात्मिक ऊर्जेने देश पुढे जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. देशात कालीमातेच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे पहिलेच विधान आहे. कोलकाता येथे रामकृष्ण मिशनने आयोजित केलेल्या स्वामी आत्मस्थानंद यांच्या शताब्दी सोहळय़ाला ते व्हर्च्युअल प्रणालीद्वारे संबोधित करत होते.
जगाच्या कल्याणासाठी अध्यात्मिक ऊर्जेने वाटचाल करणाऱया देशासोबत कालीमातेचा आशीर्वाद सदैव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी कालीमातेबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मोईत्रा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपने त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे हे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही जोडले जात आहे.
स्वामी आत्मस्थानंदजींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी रामकृष्ण परमहंस यांचे स्मरण केले. ‘स्वामी रामकृष्ण परमहंस हे असेच एक संत होते ज्यांना कालीमातेचे दर्शन झाले होते. त्यांनी आपले संपूर्ण अस्तित्व कालीमातेच्या चरणी अर्पण केले होते. हे सर्व जग, सर्व काही देवीच्या चैतन्याने व्यापलेले आहे. बंगाल आणि संपूर्ण भारताच्या श्रद्धेमध्ये हे चैतन्य दिसून येते,’ असे मोदी म्हणाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी बेलूर मठाचा उल्लेख केला. जेव्हा-जेव्हा मला तिथे जायचे होते तेव्हा गंगेच्या तीरावर बसून कालीमातेचे मंदिर दुरूनच दिसत होते. त्यानंतर एक नैसर्गिक आसक्ती तयार झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमित मालवीय यांचा टीएमसीवर निशाणा
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. कालीमाता केवळ बंगालसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी श्रद्धेचे केंद्र असल्याचे पंतप्रधान मोदी कालीमातेबद्दल भक्तिभावाने बोलले. दुसरीकडे, टीएमसी खासदाराने कालीमातेचा अपमान केला असतानाही संबंधितावर कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी कालीमातेबद्दलच्या निंदनीय विधानाचा बचाव करतात, असे टीकास्त्र त्यांनी केले.