करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून, माता सुरक्षित तर घर सुरक्षित!! या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली असून त्याची आज करमाळा तालुक्यात सुरुवात झाली. ही योजना तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयातून सुरू आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख चिवटे पुढे म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला गेला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून नवरात्रीच्या काळात नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मोफत औषधोपचार व ऑपरेशन सर्जरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय आरोग्य खात्यामार्फत होत असून करमाळ्यात सुद्धा येत्या पाच दिवसात गावोगावी हे मेळावे घेतले जाणार आहेत.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबईचे वैद्यकीय सहाय्यक रोहित वायभासे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षापासून मिळणारे अर्थसहाय्य योजनेची माहिती दिली.
यावेळी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या मोहिमेचा संकल्प मांडून संपूर्ण महाराष्ट्रात शुभारंभ करणार आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना लाभ घेतलेल्या महिलांनी धन्यवाद दिले आहेत. यावेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता व रुग्णांना देत असलेले उपचाराबद्दल उपस्थित नेते मंडळींनी समाधान व्यक्त केले.