रक्षीनजीक घटप्रभा-हुक्केरी रस्त्यावरील घटना
प्रतिनिधी /संकेश्वर
चार वाहनांच्या विचित्र अपघातात आई व मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास रक्षीनजीक घटप्रभा-हुक्केरी रस्त्यावर घडला. भारती अनिल पुजारी (वय 28) व मुलगा वेदांत अनिल पुजारी (वय 6 रा. मल्लापूर, ता. बैलहोंगल) अशी मृतांची नावे आहेत. अनिल शंकरय्या पुजारी (वय 35 रा. मल्लापूर) व किरण लोकय्या सालीमठ (वय 28 रा. मरडीमठ, गोकाक) अशी जखमींची नावे आहेत.
दुचाकीस्वार घटप्रभेकडे जात असताना समोरून इंडिका व्हिस्टा कार घटप्रभेकडून हुक्केरीकडे येत होती. याच दरम्यान हुक्केरीकडून गोकाककडे जाणाऱया सफारी आणि अर्टिगा ही तिन्ही वाहने भरधाव असल्याने अपघाताच्या ठिकाणी चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा विचित्र अपघात घडला. अनिल पुजारी हे पत्नी भारती व मुलगा वेदांत यांना घेऊन दुचाकीवरून जात होते. या अपघातात पत्नी भारती व मुलगा वेदांत या दोघांना डोक्याला जबर मार लागल्याने ते दोघे जागीच ठार झाले. तर अनिल पुजारी व इंडिगोचा चालक किरण सालीमठ हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघा जखमींना हुक्केरीच्या शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.