Tarun Bharat

वाहनचालकांची आता रात्रीच्यावेळी तपासणी

पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

राज्यात अपघातांची संख्या वाढली असून अधिकाधिक अपघात रात्रीच्यावेळी होत असतात. काही वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याने तसेच अतिवेगाने वाहन हाकत असल्यामुळे हे अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता रात्रीच्या वेळी वाहनचालकांची मद्यपान तपासणी होणार असल्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले. राज्यातील वाढते वाहन अपघात पोलिसांची डोकेदुखी बनली असून त्याच्यावर ठोस उपाय करण्यासाठी पोलीस खात्याने हा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.

काल रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. रात्रीच्यावेळी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर नसतात, याचा फायदा घेऊन काही वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पणजीतील अटल सेतूवर चालत्या वाहनांची गती तपासणारे पॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मध्यंतरी रात्रीच्यावेळी वाहनचालकांची तपासणी करणे बंद झाले होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी मद्यापान करून वाहने चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. अतिवेग आणि मद्यपान करून वाहने चालविल्यामुळे वाहन अपघात वाढले आहेत. याच्यावर आळा घालण्यासाठी रात्रीच्यावेळी वाहनचालकांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

झुआरी अपघाताचा तपास सुरू

गेल्या काही दिवसांत झालेले भीषण अपघात हे वाहनांच्या अतिवेगामळे झाले असल्याचे प्राथमिक तपासावरून उघड झाले आहे. झुआरी पुलावर झालेल्या अतिवेगाच्या अपघातात चारजणांचे बळी गेले आहेत. या अपघातातील कारचालकाने मद्यपान केले होते की नाही त्याची तपासणी करण्यात येणार आहे. मृत्यू झालेल्यांची शवचिकित्सा करण्यात आली असून त्यांचे व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. तेथून अहवाल आल्यानंतर वाहनचालकाने मद्यपान केले होते की नाही ते स्पष्ट होणार आहे.

खांडेपार येथे कॉन्स्टेबलकडून अपघात

खांडेपार येथे पोलीस कॉन्स्टेबलची कार भल्या पहाटे घराच्या भिंतीला धडक देऊन घरात घुसल्याची घटना घडली आहे. कार अतिवेगाने जात होती. घराचे मोठे नुकसान झाले आहे. या कारला कायद्याने बंदी असलेल्या काळय़ा काचा होत्या. तसेच ही कार पोलीस कॉन्स्टेबल चालवत होता. त्याने मद्यपान केले होते काय, याबाबत स्पष्टता नाही. कार अतिवेगाने होती तसेच कारला काळ्या काचा होत्या हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे बेफाम वागणाऱया पोलिसांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न विचारला असता डीजीपी म्हणाले की नियम सर्वांनाच सारखे असून वाहतुकीचे नियम मोडणाऱयांवर योग्य ती कारवाई होणारच आहे.

अतिवेगात वाहन चालविल्याने घराचे नुकसान करणाऱया या पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

मोपा विमानतळाची सुरु जनसेवा!

Amit Kulkarni

सभापतीसाठी विरोधी पक्षांची आघाडी

Patil_p

पोलिसांना धक्काबुक्कीमुळे काँग्रेस आंदोलन चिघळले

Amit Kulkarni

दिवसभरात 52 दगावले, 2814 नवे बाधित

Amit Kulkarni

गरीबांच्या रेशनाची सोय करून लॉकडाऊनची आवश्यकता

Amit Kulkarni

धारबांदोडा येथे बिबटय़ा जेरबंद

Omkar B